पिंपरी : शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची ८६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येरवडा कारागृहात असताना सायबर गुन्हे करण्यासाठी बँक खाती पुरवण्याचे नियोजन करणाऱ्या एका बीएएमएसच्या विद्यार्थ्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळगाव, पुणे) आणि अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (वय २८, रा. लातूर) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबत माहिती दिली. फिर्यादीला शेअर बाजारात मोठी रक्कम गुंतवल्यास भरघोस आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याला बळी पडून त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांत ८६ लाख रुपये पाठविले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींनी १४ जुलै २०२६ रोजी पाच लाख रुपयांची रक्कम एका बँकेच्या खात्यावर घेतल्याचे निष्पन्न झाले. हे खाते आरोपी तेजस याच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
तेजस यापूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्यातील अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. तिथे त्याची २०२४ मधील सायबर गुन्ह्यात दीड वर्षांपासून असलेल्या अविनाश याच्याशी ओळख झाली. दोघांनी तुरुंगात असतानाच सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळवण्याचा कट रचला. जामिनावर बाहेर आल्यानंतर तेजसने अविनाशच्या सांगण्यावरून स्वतःचे बँक खाते त्याला पुरवले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अविनाशला लातूर येथून ताब्यात घेतले. अविनाश हा बीएएमएस (डॉक्टर) पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने तुरुंगात शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचे संपर्क क्रमांक ‘युनिव्हर्सिटी’ या नावाने मोबाइलमध्ये जतन करून ठेवले होते.
जामिनावर सुटल्यावर त्याने या आरोपींच्या संपर्कात राहून आठ विविध बँक खाती मिळवून सायबर गुन्ह्यांसाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी सायबर गुन्ह्यांसाठी चालू बँक खाती उघडण्यासाठी दोन कार्यालये सुरू केल्याचेही तपासात उघड झाले आहे. अविनाशचे परदेशी साथीदारांसोबतही संपर्क असल्याची माहिती चौकशीत उघड झाल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सांगितले. सायबर पोलीस पुढील तपास करीत आहे.
