पिंपरी : शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची ४० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ नोव्हेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत चिंचवडगाव येथे घडली.
या प्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केले होते. ट्रेडिंग आणि स्टॉक मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवल्यास भरघोस परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादीला वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादीने एकूण ४० लाख ९ हजार १६४ रुपये गुंतवले, मात्र त्यांना कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम परत न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली १८ लाखांचा गंडा
टूर अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून एका महिलेची १८ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी जयेश शिवराज चौधरी (४०, साई चौक, पिंपरी, पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश याने फिर्यादीला आपल्या ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ या व्यवसायात २५ लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. या बदल्यात दरमहा ६० ते ७० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष त्याने दाखवले. फिर्यादीने विश्वासाने दिलेला २५ लाखांचा चेक वटवून आरोपीने त्यातील केवळ ६ लाख ६२ हजार २४१ रुपये परत केले. मात्र उर्वरित १८ लाख ३५ हजार ७५९ रुपये आणि ठरलेला परतावा न देता फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
हार्डवेअर दुकानदाराची २३ लाखांची फसवणूक; आरोपी गजाआड
विश्वासाने दुकानातून लाखो रुपयांचे हार्डवेअर साहित्य नेऊन त्याचे पैसे न देता अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना तळवडे येथे घडली.
या प्रकरणी राजेंद्र दशरथ भसे (५४, तळवडे, पुणे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुमार रवि लालबहादूर सिंग (४३, तळेगाव दाभाडे, पुणे) या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या मालकीच्या हार्डवेअर दुकानातून एकूण २३ लाख २८ हजार १९८ रुपये किमतीचे साहित्य विकत नेले होते. हे साहित्य घेऊन गेल्यानंतर आरोपीने त्याचे पैसे दिले नाहीत आणि नेलेले साहित्यही परत केले नाही. फिर्यादीच्या मालाचा अपहार करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.
ऑनलाइन गेमवर जुगार खेळणाऱ्यावर कारवाई
बेकायदेशीरपणे ऑनलाईन गेमवर लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (४ फेब्रुवारी) रोजी दुपारी त्रिवेणीनगर चौक, तळवडे येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई विनोद व्होनमाने यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी माहुल बाबासाहेब जावळे (३०, ओटास्किम निगडी, पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून लोकांकडून पैसे गोळा करून जुगार खेळत आणि खेळवत होता. पोलिसांनी धाड टाकली असता त्याच्याकडे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ११ हजार १२० रुपयांचा माल मिळून आला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

