पिंपरी : समाजमाध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आमिष दाखवून वृद्धाची ११ कोटी १३ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सायबर गुन्हे करणार्‍या नऊ जणांच्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत ही पहिलीच कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

अभय बाबासाहेब पाटील (वय ३४, रा. हातकणंगले, कोल्हापुर), शिवतेज राजेंद्र पोटे (वय ३०, रा. वाघोली), युवराज उर्फ संतोष सतीश मुदलीयार (वय ३५, रा. निबाळकर नगर, लोहगाव), रॉनी उर्फ पंकज मंगू गिरीगोस्वामी (वय २४), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (वय २३), उमेश लक्ष्मीलाल भट्ट (वय २१, रा. तिघे रा. राजस्थान), महेश करबसपा उडचणे (वय २८, रा. दहिसर ईस्ट, मुंबई), राहुल बहारदुरप्रसाद मौर्य (वय २४, रा. दहिसर पूर्व, मुंबई) शेख अब्दुल रहिस शेख अब्दुल रशीद (वय २६, रा. समतानगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मकोका कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींविरोधात एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शहरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची २० फेब्रुवारी २०२६ रोजी बनावट ट्रेडींग अ‍ॅपद्वारे ११ कोटी १३ लाखाची फसवणूक झाली होती. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान फिर्यादी यांच्या बँक खात्यातून फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या खातेधारकांकडे चौकशी केली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींना कोल्हापूर, पुणे, दहिसर, छत्रपती संभाजीनगर आणि राजस्थानातील उदयपूर येथे तपास करीत निष्पन्न करून अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात

आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. समाजमाध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. आरोपी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात होते.फसवणूकीची रक्कम युएसडीटी सारख्या आभासी चलनात वर्ग केल्याचे तपासात पुढे आले आहे.

दोन कोटी ६५ लाख परत

आरोपींनी पिपरी – चिंचवड, मुंबई, मध्यप्रदेशात सायबर फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. दरम्यान, या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी दोन कोटी ६५ लाख ७६ हजाराची रक्कम गोठवली होती. ही रक्कम वृद्धाला परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.