पिंपरी : दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची २७ लाख ६६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
महिलेच्या फिर्यादीनुसार एका महिलेसह सात वेगवेगळ्या बँक खात्यांच्या धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या पतीने इन्स्टाग्रामवर शेअर मार्केटची जाहिरात पाहून लिंकवर क्लिक केले असता त्यांना समाजमाध्यमातील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. २७ लाख ६६ हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले. गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकीच्या नावाखाली एक कोटी ३७ लाखांची फसवणूक
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची एक कोटी ३७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना भोसरी परिसरात घडली.
व्यावसायिकाने भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बालेवाडी परिसरातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी परस्पर संगणमत करून फिर्यादी यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींनी गुंतवलेली मूळ रक्कम अथवा परतावा न देता एकूण एक कोटी ३७ लाख ५७ हजार ८६३ रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
चारपट नफ्याच्या आमिषाने फसवणूक
ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास चार पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची १३ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीच्या मोबाइलवर टेलिग्रामद्वारे संदेश व लिंक पाठवून खात्रीशीर नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरमहा एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून चार नागरिकांची ३३ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
हातचलाखीने महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र लांबविले
दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून दोघांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने लांबविले. ही घटना गुरुवारी (२७ ऑगस्ट) चाकण-शिक्रापूर रोडवरील भोसे येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या सूनेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या सासूला “माझी आई आजारी असून ती बरी होण्यासाठी गरजू व्यक्तीला पैसे दान करायचे आहेत” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यांनी अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत ठेवत असल्याचा भास केला आणि हातचलाखीने सोन्याचे दागिने लांबवून पोबारा केला. चाकण पोलीस तपास करित आहेत.
