पिंपरी : डिजिटल अटक केल्याची भीती दाखवून एका व्यक्तीकडून ५२ लाख ५९ हजार रुपये उकळणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली.आकाश बाबासाहेब पठारे (वय २८) व अविनाश श्रीकांत तुंगार (दोघेही रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील एका व्यक्तीला एक अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगून दोन बँक खात्यांवर जमा झालेली रक्कम आर्थिक फसवणुकीतील असल्याचे सांगितले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यासाठी पथक निघाले असल्याची भीती दाखवण्यात आली. त्यांच्याकडून ५२ लाख ५९ हजार रुपये घेण्यात आले.
या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक तपासात एक व्यक्ती अहिल्यानगर येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आकाश याला ताब्यात घेण्यात आले. अविनाश आणि आकाश यांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपी पसार झाले आहेत.