पिंपरी : चीन मधील हॉंगकॉंग येथील एका कंपनीत नोकरी लावल्याचे पत्र, आयडी कार्ड देत तरुणांकडून सायबर गुन्हे करवून घेत फसवणुकीची रक्कम युएसडीटी मध्ये रूपांतरित करून घेत असल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. लोणावळा येथील एका व्हिला मध्ये सायबर पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली. हे चौघेजण चीन मधून निगराणी ठेवणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या देखरेखीखाली फसवणुकीची रक्कम चीनमध्ये पाठवण्याचे काम करत होते. चीनमधील गुन्हेगार या तरुणांना युएसडीटी क्रिप्टो करन्सी मध्ये पगार देत होते.

मोनिल अतुलकुमार मोदी (२४, मेहसाणा, गुजरात), रवि गोकल प्रसाद जाट (२१, राजगड, मध्यप्रदेश), रुद्रपाल सिंग गजेंद्रसिंग चौहान (२२, खंडवा, मध्यप्रदेश) आणि हंश कैलास वर्मा (१९, बोरीवली, मुंबई) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एका व्यक्तीची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे आली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर पोलिसांना मोठे रॅकेट आढळून आले.

या गुन्ह्यातील फसवणुकीची आठ लाख २५ हजार रुपये रक्कम गुजरात येथील मोनील अतुलकुमार मोदी या व्यक्तीच्या खात्यावर गेली होती. मात्र तो सतत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फिरत असल्याने तो पोलिसांना मिळून येत नव्हता. अखेर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना मोदी हा लोणावळा येथील एका व्हिला मध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायबर पोलिसांचे एक पथक लोणावळा येथे गेले. तिथे असलेल्या सुमारे ५०० व्हिला मधून आरोपी थांबलेला व्हिला शोधून पोलिसांनी मोदी याला ताब्यात घेतले. तसेच तिथे आणखी तिघेजण आढळून आले. चौघांकडून एक लॅपटॉप, सात मोबाईल, १४ डेबिट कार्ड, दोन वेब कॅमेरे, पाच बँक अकाउंट किट, एक रबरी स्टॅम्प आढळून आले.

मोनील मोदी यांच्याकडे नऊ बँकांचे करंट अकाउंट आहेत. तो वेगवेगळ्या राज्यात जाऊन या अकाउंटचा सायबर फसवणुकीतील रक्कम घेण्यासाठी वापर करत होता. मोदी हा व्हिला मध्ये एका खोलीत वेब कॅमेऱ्याच्या निगराणीत बसला होता. तो वेगवेगळ्या बँक खात्यातील रक्कम एका खात्यात जमा करत होता. त्याने तब्बल एक कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा केली होती. रवी जाट आणि रुद्रपाल चौहान हे मोदी याच्या खात्यातून इतर खात्यांमध्ये रक्कम पाठवत होते. त्यांच्यावर हंश वर्मा हा निगराणी ठेऊन त्यांना सूचना देत होता. या चौघांवर हॉंगकॉंग येथून अज्ञात आरोपी लक्ष ठेऊन होते. हॉंगकॉंग मधील आरोपींना हे चार आरोपी युएसडीटी क्रिप्टो करन्सी मध्ये ही फसवणुकीची रक्कम पाठवत होते. त्याबदल्यात मोदी याला एक टक्के तर रवी आणि रुद्रपाल यांना तीन हजार रुपये पगार युएसडीटी क्रिप्टो करन्सी मध्ये दिला जात होता. रवी आणि रुद्रपाल यांना हॉंगकॉंग मधील आरोपींनी किंग पेमेंट ग्लोबल या कंपनीत नोकरीस लावले होते. त्याचे पत्र आणि आयडी कार्ड देखील त्यांना देण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. सायबर पोलीस तपास करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्‍त आयुक्त, सारंग आव्हाड, उपायुक्‍त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्‍त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहीत डोळस, प्रकाश कातकाडे, विदया पाटील अंमलदार, दिपक भोसले, हेमंत खरात, विनायक म्हसकर, सुभाष पाटील, किरण देवकर, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, प्रविण शेळंकदे, अतुल लोखंडे, सोपान बोधवड, माधव आरोटे, नितेश बिचेवार, दिपाली चव्हाण यांच्‍या पथकाने केली.