पिंपरी : दहीहंडीच्या उत्साहात ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून करणाऱ्या मंडळ आणि ‘डीजे’ मालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. डीजेचे साहित्य जप्त करून १६ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दहीहंडी कार्यक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजक आणि डीजे मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली यांनी ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
आगामी उत्सवांमध्येही नजर
ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर निर्धारित मर्यादेत आणि नियमांचे पालन करूनच करावा. मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि पर्यावरणाचा विचार करून उत्सव साजरे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आगामी सण-उत्सवांमध्येही ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
| पोलीस ठाणे</th> | दाखल गुन्हे |
|---|---|
| निगडी | ४ |
| बावधन | ३ |
| पिंपरी | १ |
| संत तुकाराम नगर | १ |
| दापोडी | १ |
| हिंजवडी | १ |
| वाकड | १ |
| काळेवाडी | १ |
| भोसरी | १ |
| दिघी | १ |
| चाकण दक्षिण | १ |
| एकूण | १६ |
