पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्द भाजपने दिला आहे. तो पाळणार असून माझ्याच कार्यकाळात दररोज पाणीपुरवठा केला जाईल’, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांनी दिली. पाणी, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर लांडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, नगरसेवक राजू मिसाळ यावेळी उपस्थित होते. ‘प्रशासकीय राजवटीत नागरिकांची गैरसोय झाली आहे, याची आम्हाला जाणीव आहे. आता सर्व नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील’ असे सांगून महापौर लांडगे म्हणाले, ‘शुद्ध, नियमित पाणीपुरवठा करण्यावर माझा भर राहील. चिखली जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांची, रावेत बंधाऱ्याची पाहणी करणार आहे.
भामा आसखेड जलवाहिनीच्या कामांची माहिती घेणार आहे. या कामाच्या ठेकेदाराने दिरंगाई केल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करण्यात अडथळा आला आहे. या ठेकेदाराकडून काम काढून घेतले जाणार आहे. दररोज पाणी देण्याचा शब्द माझ्याच कार्यकाळात पूर्ण केला जाईल. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल. महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे’.
‘प्रशासकीय काळातील कामांची माहिती घेतली नाही. त्याची सविस्तर माहिती घेणार आहे. माहिती घेतल्यानंतर चौकशी करायची की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी महापालिका निवडणूक प्रचारात जे काही मुद्दे मांडले होते. त्या सर्व प्रकरणाची माहिती घेतली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेला पूर्ण मदत करणार आहेत. त्यामुळे कोणतीही आर्थिक अडचण येईल, असे वाटत नाही, असे महापौर रवि लांडगे म्हणाले.
‘प्रत्येक नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील. महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाणी, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे. मोकाट श्वानाचा बंदोबस्त केला जाईल. महापालिकेचा आकृतीबंद मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. विकास आराखड्याबाबत ५० हजार हरकती आल्या आहेत. त्यामुळे विकास आराखडा तपासून बघितला जाणार असल्याचे’ महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. सहा वर्षे होत आले, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे. आता महापौर रवि लांडगे यांनी दररोज पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे. कधीपासून दररोज पाणीपुरवठा होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

