पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राखीव भूखंड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील निवडक ठिकाणी घनदाट जंगल (डेन्स फॉरेस्ट) विकसित करण्याची संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती’, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

महापालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन, शहरात हरित क्षेत्र वाढ आणि नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात आयोजित बैठकीत आयुक्तांनी ही माहिती दिली. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक अमित गावडे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनील पवार यावेळी उपस्थित होते.

‘घनदाट जंगल विकसित केल्यास शहरातील हरित क्षेत्रात मोठी वाढ तर तापमानात घट होईल. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहर उभारण्यासाठी महापालिका विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे’, असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

‘वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान लक्षात घेता पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. महापालिका नागरिकांना रोपे, खत व आवश्यक तांत्रिक सहकार्य करेल. शहरात पुढील काळात तब्बल दोन लाख वृक्षारोपणाचा मानस आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घ्यावा’, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले.

स्वच्छ, हरित शहर योजना

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वच्छ व हरित पिंपरी-चिंचवड शहर योजना’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही योजना महापालिका आणि लोकसहभागातून यशस्वी करण्यात येईल, असे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केले.