पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विद्यमान उपमहापौर शर्मिला बाबर आणि माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे या दोघीही वादात सापडल्या आहेत. महापालिका सभेतील भूमिकेवरुन निगडी प्राधिकरणातील एकाच प्रभागातून भाजपकडून निवडून आलेल्या या आजी-माजी उपमहापौरांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

महापालिका सभेत वाकड येथील शिल्पा गवारे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेविकांनी केली. याबाबत नगरसेविकांनी आपली मते व्यक्त केली. हुंडाबळीच्या घटना रोखल्या पाहिजेत. वाकडमध्ये अशा दोन घटना घडल्या आहेत. महिलांसाठी असलेल्या कायद्यांची जनजागृती केली पाहिजे. हुंडाबळीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घ्यावी. शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी नगरसेविकांनी केली.

या शोक प्रस्तावावर बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर हसत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. त्यामुळे उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यावर टीकेची झोड उठली. आपली चूक झाल्याचे लक्षात येताच उपमहापौर शर्मिला बाबर यांनी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. ‘शोकप्रस्ताव वाचताना माझ्याकडून अनाहूतपणे चूक झाली. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करते. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. माझा स्वभाव हसरा आहे’.

याच प्रभागातील भाजप नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी विद्युत दाहिनीच्या समस्येबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. ‘पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रभागांतील विद्युत दाहिनीत समस्या आहेत. वारंवार मागणी करूनही त्याची दुरुस्ती केली जात नाही. मी प्रशासनाचा निषेध करते. विद्युत दाहिनीची दुरुस्ती न झाल्यास पुढील वेळेस प्रशासनाचा निषेध करून सभात्याग करावा लागेल. या कामाच्या ठेकेदाराची आम्हाला नावे द्यावीत. या ठेकेदाराला विद्युत दाहिनीतच जाळेन’, असे धक्कादायक विधान भाजप नगरसेविका मोरे यांनी केले. यावरून टीका होऊ लागताच त्यांनीही दिलगिरी व्यक्त केली. ‘माझ्याकडून हे शब्द निघाले. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. पाच महिन्यांपूर्वी निगडी स्मशानभूमीतील दुरावस्थेबाबत महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र दिले होते. त्याची आतापर्यंत दखल घेतली नाही. दुरावस्थेबाबत नागरिक जाब विचारत आहेत. त्याचा उद्रेक होता. त्यातून माझ्याकडून चुकीचे शब्द निघाले. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते’, असे नगरसेविका मोरे म्हणाल्या.

क्षेत्रीय कार्यालयात समुपदेशन केंद्र

वाकड येथील शिल्पा गवारे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका श्रुती वाकडकर, आरती चोंधे यांनी केली. शहरात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी महिलांच्या समुपदेशनासाठी दहा क्षेत्रीय कार्यालयांत समुपदेशन केंद्र उभारण्याचे आदेश महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला दिले.