पिंपरी: पवना धरण क्षेत्रात तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराला दोन आठवडे पुरेल इतका पाणीसाठा नव्याने जमा झाला आहे. त्यामुळे तूर्त शहराला पाणीकपात करावी लागणार नाही, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अडीच वर्षांपासून ‘दिवसाआड एकवेळ’, अशी पाणीकपात सुरू आहे. त्यात आणखी पाणीकपात करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पाणीसाठा खूपच कमी झाल्याचे सांगत यापुढे काटकसरीने पाणीवापर करा आणि आणखी मोठी पाणीकपात करा, अशी स्पष्ट सूचना पाटबंधारे विभागाने पत्राद्वारे पिंपरी महापालिकेला केली होती. या पार्श्वभूमीवर, आणखी पाणीकपात करावी लागेल, अशी चिन्हे होती. तथापि, गेल्या तीन दिवसांत पवना धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे. पवना धरणातील पाणीसाठा २० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तूर्त पाणीकपात करण्याची वेळ येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने गुरूवारी स्पष्ट केले.