पिंपरी : राज्यातील सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याने आता महाविकास आघाडी ही अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’बरोबर जाण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानंतर काँग्रेसनेही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे आघाडीसाठी प्रस्ताव दिला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षही पवार यांच्याबराेबर जाण्याबाबत पक्षनेतृत्वाकडे विचारणा करणार असल्याने ‘मविआ’ ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला पार पडणार आहे. मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरात सर्वाधिक ताकद असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर लढणार आहेत. या दोन्ही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. भाजप स्वबळावर लढणार असल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांची भेट घेत महाविकास आघाडीमधून एकत्रित लढण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर काँग्रेसच्या निवडणूक समितीचे सदस्य मनोज कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची भेट घेऊन आघाडी करण्यासाठी प्रस्ताव दिला. तसेच २० जागांची मागणी केली. शिवसेना (ठाकरे) पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचीही अजित पवार यांच्याबरोबर जाण्याची भूमिका आहे. याबाबत पक्षनेतृत्वाकडे विचारणा केली जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पवार यांच्याबरोबर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेत सत्ता आणण्यासाठी अजित पवारही महाविकास आघाडीला बरोबर घेण्यास सकारात्मक असल्याचे या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महायुतीत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षालाही बरोबर घेण्याच्या हालचाली अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने सुरू केल्या आहेत.

युतीबाबत भाजपसोबत चर्चा सुरू असून बैठकही झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडूनही संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही, असे शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

भाजपच्या विरोधात असतील, त्यांच्यासोबत आघाडी करण्याचे स्थानिक पातळीवर ठरले आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आघाडीसाठी प्रस्ताव दिला आहे, असे काँग्रेसचे निवडणूक समिती सदस्य मनोज कांबळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत निवडणूक लढवावी, अशी महाविकास आघाडीची मानसिकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर युती करावी का, याबाबत पक्षनेतृत्वाकडे विचारणा करणार आहे, असे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडीतील पक्षांकडून आघाडीबाबत प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. शिवसेना (शिंदे) पक्षाबरोबरही चर्चा सुरू आहे. शनिवारी अंतिम निर्णय होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस, (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.