पिंपरी : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला महापालिकेची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागरचना ‘जैसे थे’ राहणार आहे. २०१७ प्रमाणे चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, ३२ प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणेच १२८ राहण्याची शक्यता आहे.महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. मात्र, करोना प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा, अशा विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक तीन वर्षांपासून लांबणीवर पडली आहे.

२०१७ च्या निवडणुकीत १७ लाख लोकसंख्येला महापालिकेत १२८ नगरसेवक आणि ३२ प्रभाग होते. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. सध्याची लोकसंख्या ३० लाखांवर गेली असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रतिस्पर्धी आहेत. २०१७ मध्ये भाजपने राष्ट्रवादीकडून महापालिकेतील सत्ता खेचून घेतली. आता अजित पवार हे भाजपबरोबर आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष महापालिका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार, की स्वबळावर याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

आजपर्यंतची प्रभाग पद्धती

महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. मात्र, १९८६ पर्यंत प्रशासकीय राजवट होती.

१९८६ – पहिली निवडणूक झाली. तेव्हा, एक सदस्यीय प्रभाग पद्धती व ६० प्रभाग

१९९२ – निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग पद्धती व ७८ प्रभाग

१९९७ – निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग पद्धती व ७९ प्रभाग

२००२ – तीन सदस्यीय प्रभाग पद्धती व ३५ प्रभाग होते, नगरसेवक संख्या १०५

२००७ – एक सदस्यीय प्रभाग पद्धती व नगरसेवक संख्या १०५

२०१२ – द्विसदस्यीय प्रभाग पद्धती व ६४ प्रभाग होते, नगरसेवक संख्या १२८

२०१७ – चार सदस्यीय प्रभाग पद्धती व ३२ प्रभाग होते, नगरसेवक संख्या १२८

२०१७ मधील पक्षीय बलाबल

भाजप – ७७

राष्ट्रवादी कॉंग्रेस – ३६

शिवसेना – ९

मनसे – १

अपक्ष – ५

भाजपाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा नियोजनबद्धरीत्या विकास झाला. शहरातील नागरिकांना आणि भूमिपुत्रांना न्याय देत शहर विकासाची भूमिका ठेवली आहे. ती आगामी काळातही तशीच राहील. संघटनात्मक पातळीवर तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलेल यात शंका नाही. महेश लांडगे, आमदार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची निवडणुका लढण्याची तयारी झाली आहे. महाविकास आघाडी किंवा पक्ष आदेशाप्रमाणे स्वतंत्र निवडणुका लढून महापालिका जिंकण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत.तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. अद्याप कोणत्याची सूचना देण्यात आलेल्या नाहीत. अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका