पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम तीव्र केली जाणार आहे. पादचाऱ्यांना मोकळा आणि सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी ‘अतिक्रमणमुक्त पदपथ’ मोहिमेला गती देण्यात येत असून, त्याकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विशेष पथके कार्यरत राहणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
अनधिकृत जाहिराती, अतिक्रमणे, परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामासंबंधी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रमुख अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी प्रशासनाला विविध सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, सहायक आयुक्त किरणकुमार माेरे, अमित पंडित, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे आदी बैठकीला उपस्थित होते.
शहरातील पदपथ अनधिकृत फेरीवाले, विक्रेत्यांनी गिळंकृत केले आहेत. नागरिकांना पदपथावरून चालणे मुश्कील झाले आहे. त्यांना सेवा रस्त्याने चालावे लागते. या पार्श्वभूमीवर, डॉ. सूर्यवंशी यांनी पदपथ अतिक्रमणमुक्तीचा निर्धार केला असून, त्यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.
अनधिकृत जाहिरातदारांना नोटीस
शहरातील भिंती, दूरध्वनी खांब आणि महावितरणच्या डीपीवर लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरातफलक तत्काळ हटविण्यात येणार आहेत. अशा फलकांवरील मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधितांना नोटीस बजावण्याची कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
‘घर घेताना परवानगीची खात्री करा’
शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई महापालिका तीव्र करणार आहे. अशा बांधकामांत नागरिकांनी सदनिका खरेदी करू नये. तसेच, खरेदी करीत असलेले घर किंवा सदनिकेला अधिकृत बांधकाम परवानगी असल्याची खात्री करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.
वाकडमधील ३३ पत्राशेडवर हातोडा
महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जगताप डेअरी ते वाकड परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ३३ पत्राशेडवर हातोडा मारण्यात आला. वाकड परिसरातील अनधिकृत १०४ मालमत्तांची यादी तयार करण्यात आली होती. न्यायालयीन स्थगिती, अटींसह स्थगिती असलेल्या मालमत्ता वगळता उर्वरित सर्व अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. धडक कारवाई पथक, बीट निरीक्षक असे १५० अधिकारी व कर्मचारी, १०४ पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ६० जवान उपस्थित होते.
अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जेसीबीचा वापर करण्यात आला. शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवून नागरिकांना सुरक्षित आणि नियोजनबद्ध शहरी सुविधा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शहरातील कोणतेही अनधिकृत बांधकाम सहन केले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करूनच बांधकाम करावे, अन्यथा अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल. या परिसरातील कारवाई गुरुवारी देखील सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
