पिंपरी : मागील सव्वासहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आणखी वर्षभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेले जलवाहिनीचे काम ठेकेदाराला तीनवेळा मुदतवाढ देऊनही रखडले आहे. ठेकेदाराने मागणी केलेला वाढीव दर देण्यास प्रशासनाने नकार दर्शविला असून संबंधित ठेकेदाराला बडतर्फ करून नवीन ठेकेदार नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परिणामी, प्रकल्प पूर्ण होण्यास जानेवारी २०२७ उजाडणार असून तोपर्यंत नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेने मावळातील आंद्रा धरणातून शंभर आणि खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ दशलक्ष लीटर पाणी आणण्याचे नियोजन केले. खेड येथील वाकीतर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर आणि तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी १८.३० किलोमीटर अंतराची १४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. हे काम १५ डिसेंबर २०२० रोजी एका ठेकेदाराला दिले. १६२ कोटी रुपयांचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत संपणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाने तीनवेळा दिलेल्या मुदतीतही ठेकेदाराला काम पूर्ण करता आले नाही. सद्य:स्थितीत ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
महापालिकेने मार्च २०२६ पर्यंत ठेकेदाराला मुदतवाढ दिली होती. परंतु, या मुदतीत ३५ टक्के काम पूर्ण होणार नसल्याने ठेकेदाराने मुदतवाढीसह दर वाढवून मागितला होता. दर वाढवून दिले नाही, तर काम करू शकत नसल्याचे ठेकेदाराने प्रशासनाला सुनावणीत सांगितले. प्रशासनानेही दर वाढवून दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला बडतर्फ करून नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्याची चाचपणी प्रशासनाने सुरू केली आहे. अर्धवट कामासाठीची निविदा प्रक्रिया, नवीन ठेकेदार नियुक्त करणे, काम पूर्ण करून घेण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आंद्रा पाणी योजना कागदावरच
मावळ तालुक्यातील आंद्रा धरणातील शंभर दशलक्ष लीटर पाणी शहरासाठी आरक्षित आहे. आंद्रातून पाणी आणण्याच्या प्रकल्पास विलंब होण्याची शक्यता गृहीत धरून निघोजे येथे तात्पुरते अशुद्ध जलउपसा केंद्र उभारण्यात आले आहे. तेथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून दररोज ९० दशलक्ष लीटर पाणी उचलले जात आहे. थेट धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली नाही.
दैनंदिन उपलब्ध पाणी (एमएलडी – दशलक्ष लिटरमध्ये)
- पवना धरण – ५५०
- एमआयडीसी – ३०
- आंद्रा धरण – ९०
- एकूण – ६७०
भविष्यातील पाणीपुरवठा नियोजन (दैनंदिन एमएलडीमध्ये)
- पवना, आंद्रा, एमआयडीसी मिळून – ६७०
- भामा-आसखेड पाणी – १६७
- एकूण – ८३७
(मुळशी धरणातून पाणी आणण्याचाही प्रस्ताव आहे)
भामा आसखेड जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मुदतवाढीसह दर वाढवून मागितला होता. दर वाढवून देणे शक्य नाही. ठेकेदारासोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
