पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात पाच हजार ४३५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक कोटी १५ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर शहर कचराकुंडीमुक्त करण्याचे प्रयत्न महापालिकेच्या वतीने सुरू आहेत. शहरातील सर्व ठिकाणच्या कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्याबाबत एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, स्वयंसेवक नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.

त्यानंतरही नागरिक मोकळ्या जागा, रस्त्याच्या कडेला, पदपथ तसेच नदीपात्र, नाल्यात प्लास्टिकच्या पिशवीत भरून कचरा फेकून देतात. विशेषत: रात्रीच्या वेळी कचरा टाकला जातो. कचरा टाकू नये, असे लिहिलेल्या फलकाखालीच कचरा भरलेल्या पिशव्या फेकल्याचे दिसते. मोकाट श्वान, जनावरांकडून कचरा विखुरला जातो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते. कचऱ्याचे असे ढीग निर्माण होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन आरोग्य विभागाच्या पथकाकडून सध्या कारवाई केली जात आहे. प्रशासनाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून वर्षभरात एक कोटी १५ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शंभर ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड

‘उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून १०० ते ५०० रुपये दंड आकारला जातो. कंपन्या, दुकानदार व व्यावसायिकांना पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड केला जातो. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत एकूण पाच हजार ४३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे,’ अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी घंटागाडीतच कचरा टाकावा. वारंवार आवाहन करूनही काही नागरिक उघड्यावर कचरा फेकतात. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.