पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांनी जल्लोषात अन् भक्तीमय वातावरणात शुक्रवारी गणरायाला निरोप दिला. अनेक गणेश मंडळांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांचे छायाचित्र असलेले फलक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये घेतले होते. ‘झाले बहु, होतील बहु, परंतु दादासम दादाच, कामाचा माणुस’ असा मजकूर फलकावर होता.
पिंपरी-चिंचवड आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वेगळेच नाते. त्यांचे शहरावर प्रचंड प्रेम होते. ३० वर्षे शहराचे राजकारण अजित पवार यांच्याभोवती फिरत होते. शहराच्या विकासात, जडणघडणीत अजित पवार यांचे मोठे योगदान राहिले. जानेवारी महिन्यात अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शहरावर प्रेम करणारे नेतृत्व हरपल्याची भावना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक गणेश मंडळांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. विसर्जन मिरवणुकीतही अजितदादांची आठवण काढली. मयुरेश्वर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांचे छायाचित्र असलेले फलक हातामध्ये घेतले होते. ‘झाले बहु, होतील बहु, परंतु दादासम दादाच, कामाचा माणुस’ असा मजकूर फलकावर होता.
ढोल ताशा पथकातील सिलेंडर बंद
मंडळाच्या मिरवणुकीत ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. त्यातील सिलेंडरचा आवाज जास्त होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून सिलेंडर तत्काळ बंद करायला लावले.
रुग्णवाहिकेला तत्काळ रस्ता
चिंचवडगावात मिरवणुकीचा उत्साह सुरू असताना एक रुग्णवाहिका आली होती. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रुग्णवाहिकेला तत्काळ रस्ता मोकळा करून दिला. अवघ्या दोन मिनिटांत रुग्णवाहिका गर्दीच्या बाहेर पडली.
मंडळाच्या देखाव्यांना केबलचा अडथळा
चिंचवड परिसरातील मंडळांनी उंच देखावे सादर केले होते. या देखाव्यांना अनधिकृत केबलचा अडथळा ठरत होता. काठीने केबल उचलून मंडळांना पुढे जावे लागत होते. त्यामुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळली होती.
रथांची रेलचेल
ज्ञानदीप मित्र मंडळाने द्रोणागिरीरथ साकारला होता. श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने प्रेम मंदिर साकारले होते. नव गजानन मित्र मंडळाने श्री स्वामी समर्थ देखावा सादर केला. गांधी पेठ तालीम मित्र मंडळाने जय श्री श्याम रथ, समर्थ मित्र मंडळाने श्री सद्गुरू रथ साकारला होता. रंगाची मनसोक्त उधळण केली. श्री शिवाजी उदय मित्र मंडळाने साकारलेला डॉल्फिन रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जय गुरुदत्त मित्र मंडळाने शिवरथ, श्री दत्त मित्र मंडळाने मयूररथ, गावडे कॉलनी सांस्कृतिक मित्र मंडळाने सुवर्णरथ, संघर्ष मित्र मंडळाने गजरथ साकारला होता. अष्टविनायक मित्र मंडळाने सुवर्णरथ, गावडे पार्क मित्र मंडळाने नृसिंह अवतार, श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाने शिवपार्वती रथ साकारला होता. श्री लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळाच्या मिरवणुकीत ज्ञानप्रबोधनीचे मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते. समता तरुण मित्र मंडळाने महाकाल अघोरी जिवंत देखावा सादर केला. नवतरुण मित्र मंडळाने बालाजी रथ, श्री मयुरेश्वर मित्र मंडळाने महाकाली, सुदर्शन मित्र मंडळाने मयुररथ साकारला होता.
