पिंपरी: गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचा आरोप होत असून, उद्या, शुक्रवारी (२५ सप्टेंबर) होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसमोरही खड्ड्यांचे विघ्न आहे. शहरातील खड्ड्यांत दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे भर पडली. मात्र, रस्त्यांवर केवळ २५१ खड्डे असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पक्के, कच्चे, डांबरी, काँक्रीटचे असे दोन हजार ७३ किलोमीटर अंतराचे १२ फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. जूनपासून शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर तीन हजार ६० खड्डे पडले. त्यांपैकी आतापर्यंत दोन हजार ८०९ खड्डे बुजविल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी ते चिंचवड स्टेशनदरम्यान आणि निगडीतील सेवा रस्त्याची अशरक्ष: चाळण झाली आहे. बीआरटी मार्गात खड्डेच खड्डे आहेत. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहतूक संथ होत असून, कोंडीत भर पडत आहे.
चार महिन्यांत तीन हजार खड्डे
शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर जूनपासून तीन हजार ६० खड्डे आढळले. त्यांपैकी डांबर आणि कोल्ड मिक्सने ९९२, बीबीएमने ५४, खडीने एक हजार २८९, पेव्हिंग ब्लॉकने २४५, काँक्रीटने २२९ असे दोन हजार ८०९ खड्डे महापालिकेने बुजविले. हे प्रमाण ९१.८० टक्के आहे. शहरातील केवळ २५२ खड्डे बुजविणे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
समतल विलगकामध्ये कोंडी
पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांच्या समतल विलगकामधील आगमन-निर्गमनामध्ये सातत्याने बदल केला जातो. चिंचवड स्टेशन, निगडीतील पवळे उड्डाणपुलाच्या अलीकडील आगमन-निर्गमन मार्गांत बदल केला आहे. त्यामुळे समतल विलगकामध्ये वाहतूक कोंडीत भर पडत आहे. निगडीत समतल विलगकामधून बाहेर पडण्यासाठी मार्ग नसतानाही रिक्षा, दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येऊन बाहेर पडतात. त्यातून वाहतूक कोंडी वाढत आहे.
शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. महामार्गावरील सेवा रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्याने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
