पिंपरी : पिंपरी आणि चिंचवड परिसरात अनंत चतुर्दशीदिनी पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुका पहिल्यांदाच डीजेच्या कर्कश आवाजाविना झाल्या. पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवसाच्या विसर्जनावेळी पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईचा परिणाम शुक्रवारी निघालेल्या अंतिम मिरवणुकांमध्ये दिसून आला. बहुतांश मंडळांनी डीजेला फाटा देत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला. मात्र, ढोल ताशांचा दणदणाट ११० डेसिबलवर पोहोचला होता.

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये नियमबाह्य डीजे आणि मोठ्या साऊंडचा वापर करणाऱ्या मंडळा विरोधात पोलिसांनी आक्रमक धोरण स्वीकारले. केवळ सूचना किंवा नोटिसांपुरते मर्यादित न ठेवता गुन्हे दाखल करून साऊंड सिस्टिम आणि वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे अनंत चतुर्दशीपूर्वीच नियम मोडल्यास थेट कारवाई होणार असल्याचा स्पष्ट संदेश मंडळांपर्यंत पोहोचला होता. पोलिसांनी १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल केले. तसेच, ८६ डीजे साऊंडसह वाहने जप्त केली. या सलग कारवाईमुळे अंतिम विसर्जनाच्या दिवशी मंडळांनी सावध पवित्रा घेत मोठ्या साऊंडचा वापर टाळला.

अध्यक्ष, डीजे चालकांना तंबी

अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांची तयारी सुरू असताना काही ठिकाणी वाहनांवर मोठ्या साऊंडच्या थप्पी लावण्यात आल्या होत्या. मात्र, मिरवणुका सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्या खाली उतरविण्याच्या सूचना दिल्या. मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डीजे चालक आणि मालकांना नियमांची स्पष्ट कल्पना देत उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करून साऊंड व वाहन जप्त करण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच मोठ्या साऊंडचा वापर रोखण्यात आला.

पोलीस- कार्यकर्त्यांमधील संघर्ष टळला

मागील काही वर्षांत डीजे बंद करण्याच्या सूचनांवरून पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत होते. काही ठिकाणी साऊंड बंद करण्यासाठी पोलिसांना थेट हस्तक्षेप करावा लागत होता. यंदा मात्र सुरुवातीपासून एकसमान आणि कठोर धोरण अवलंबल्याने अंतिम विसर्जनाच्या दिवशी संघर्ष झाला नाही. मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या सूचनांना प्रतिसाद दिला. त्यामुळे मोठ्या साऊंडच्या दणदणाटाविना आणि कोणताही मोठा तणाव निर्माण न होता पिंपरी-चिंचवडमधील विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.

ढोल ताशांचा दणदणाट ११० डेसिबलवर

मोठ्या क्षमतेच्या डीजेचा वापर थांबल्याने मिरवणूक मार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना कर्कश आवाजाचा त्रास कमी झाला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबांसह विसर्जन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी वातावरण तुलनेने सुसह्य राहिले. मात्र एकीकडे डीजेच्या कर्कश कसे आवाजापासून नागरिकांना सुटका मिळाली असताना दुसरीकडे ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्याच्या दणदणाटाने ११० डेसिबलची मर्यादा गाठली. 

गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरा व्हावा, यासाठी सुरुवातीपासूनच डीजे व ध्वनिप्रदूषणाबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनंत चतुर्दशीला बहुतांश मंडळांनी स्वतःहून डीजे टाळून ढोल-ताशांना प्राधान्य दिले. नागरिक आणि मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शहरातील विसर्जन सोहळा शांततेत पार पडल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.