पिंपरी : ‘मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांतील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कचरा व्यवस्थापनातील अडचणींचे कारण पुढे करून जबाबदारी झटकण्याऐवजी अधिकाऱ्यांनी समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून, आढावा घेण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कचऱ्याची समस्या मार्गी लावण्याची सूचना आमदार शंकर जगताप यांनी केली.

शहरातील कचरा समस्येबाबत आमदार जगताप यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयुक्त विजय सूर्यवंशी, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, शहर अभियंता मनोज सेठिया, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे या वेळी उपस्थित होते.

‘मोशी दुर्घटनेनंतर कचरा संकलन आणि वाहतुकीच्या व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नसल्याने रस्त्यांच्या कडेला आणि कचरा कुंड्यांजवळ ढीग साचत आहेत. ठिकठिकाणी साचणारा कचरा, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे शहरवासीय त्रस्त आहेत. शहरातील प्रत्येक भागात नियमित कचरा संकलन, वेळेत वाहतूक आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कोणत्याही नागरिकाला कचऱ्यामुळे त्रास होता कामा नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,’ अशा सूचना आमदार जगताप यांनी दिल्या.

कचरा डेपो हटविण्यासाठी माेशीकरांचे आंदाेलन

गेल्या ४० वर्षांपासून संपूर्ण शहराचा कचरा माेशी डेपाेत टाकला जात आहे. डेपाेची क्षमता संपली असतानाही दुसऱ्या ठिकाणी कचरा डेपाे केला नाही. त्यामुळे माेशीकरांचा कचऱ्याचा त्रास वाढला आहे. हा कचरा डेपाे हटविण्यात यावा. शहरातील दहा क्षेत्रीय कार्यालयांत कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करावे, अशी मागणी माेशीकरांनी केली आहे. कचरा डेपाे हटविण्याबाबत गुरुवारी माेशीतील नागेश्वर महाराज मंदिरात बैठक झाली. या बैठकीत डेपाे हटविण्याच्या मागणीसाठी पाच नाेव्हेंबर राेजी आंदाेलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.