पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील डेपोतील कचरा कोसळून इमारत पडल्याने शहरात कचरा कोंडी झाली आहे. गुरुवारी कचरा संकलनाचे नियोजन कोलमडले होते. अनेक भागांत कचरा संकलनच झाले नाही. डेपोवर कचरा गाड्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्याने आता तात्पुरत्या स्वरूपात क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कचरा साठवण्यात येणार आहे. तीन क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कचरा ठेवण्यासाठी अद्यापही जागेचा शोध सुरू आहे.

संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून संकलित केला जातो. हा कचरा मोशी डेपोत टाकला जातो. बुधवारी मोशीतील कचऱ्याचे डोंगर पडल्याने तेथील प्रशासकीय इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली अद्यापही आठ जण अडकले असून शोधमोहीम सुरू आहे. रस्ता बंद आहे.

कचऱ्याच्या गाड्यांना तिथे जाता येत नाही. त्यामुळे महापालिकेला कचरा ठेवण्यासाठी तात्पुरत्या जागांचा शोध घ्यावा लागत आहे. गुरुवारी घरोघरचा कचरा संकलन करण्याचे नियोजन कोलमडले होते. काही भागांमध्ये नियोजित वेळेपेक्षा अतिशय विलंबाने घंटागाडी आली. अनेक भागांत कचरा संकलनासाठी घंटागाडीच आली नाही. त्यामुळे घरातील कचराच उचलण्यात आला नाही. जागा नसल्याने घंटागाड्या कचऱ्यासह क्षेत्रीय कार्यालयात उभारण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, मोशी डेपोत कचरा गाड्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. बचावकार्याला किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये कचरा साठविण्यात येणार आहे. त्यासाठी पाच क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जागा शोधल्या असून अ, ब आणि ग या कार्यालय हद्दीत जागांचा शोध सुरू आहे.

डेपोत गाड्या जाण्यासाठी रस्ता झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात साठवलेला कचरा उचलण्यात येणार आहे. पालखी मार्गाची स्वच्छता, डेपोवर जाण्यासाठी जागा नसल्याने गुरुवारी कचरा संकलनाचे नियोजन कोलमडले होते. शुक्रवारपासून संकलन सुरळीत होईल.चिंचवड परिसरात कचरा संकलनासाठी घंटागाडी आली नाही. त्यामुळे या परिसरातील गुरुवारचा कचरा उचलण्यात आला नाही, असे नागरिक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले.