पिंपरी : इस्त्रायल – अमेरिका आणि इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन जिल्ह्यात गॅस सिलिंडरची साठेबाजी आणि काळाबाजार करणार्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अन्न पुरवठा विभागाने शुक्रवारी कासारवाडी येथील एका गॅस एजन्सीवर टाकलेल्या छाप्यात गॅस एजन्सी शेजारील एका गोदामात अवैधपणे गॅस सिलिंडरचा साठा केल्याचे समोर आले. या छाप्यात ५४ भरलेले आणि २०७ रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी चोरट्या मार्गाने घरगुती गॅसचा वापर सुरू केल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे आल्या आहेत. घरगुती ग्राहकांकडूनदेखील गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पुणे शहरासाठी दोन आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी दोन अशी एकूण चार विशेष पथके तैनात केली आहेत. कासारवाडी येथील एका गॅस एजन्सीबाबत ग्राहकांकडून सिलिंडर पुरवठा विलंबाबाबत तक्रारी आल्या होत्या. तसेच, येथे अवैधरित्या सिलिंडरचा साठा केला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी एजन्सीवर अन्न पुरवठा परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर, प्रदीप डंगारे, वशिष्ठ पांचाळ, सुशांत ओव्हाळ यांच्या पथकामार्फत छापा टाकण्यात आला.
या कारवाईत एजन्सीच्या बाजूला एका गोदामात अवैधरित्या दोन ट्रकमध्ये ५४ भरलेले गॅस सिलिंडर आणि २०७ रिकामे गॅस सिलिंडर आढळून आले. एजन्सीचे अधिकृत गोदाम गहूंजे येथे असताना अवैधरित्या लगतच्या गोदामात सिलिंडरचा साठा करून ठेवल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भारत पेट्रोलियमचे क्षेत्रिय अधिकारी आणि जिल्हाधिकार्यांना कारवाईचा अहवाल पाठविण्यात येणार असलयाचे परिमंडल अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी सांगितले.
