पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने आकुर्डी रेल्वे स्थानक, काळभोरनगर येथील भुयारी मार्गात पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांची कसरत झाली. सखल भागात पाणी साचू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश महापौर रवी लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शहरात सोमवारी गारांचा पाऊस झाला होता, बुधवारी हलक्या सरी कोसळल्या. गुरुवारी सकाळी कडक ऊन होते. दुपारनंतर ढग दाटून आले. सव्वादोनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, निगडीसह सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला.

आकुर्डी रेल्वे स्थानक येथील भुयारी मार्ग, काळभोरनगर, वल्लभनगर, कासारवाडी, मोशी रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांची त्रेधा उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने महापालिकेच्या उपाययोजनांचा फज्जा उडाला. पिंपरी परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला.

‘तातडीने उपाययोजना करा’

अनेक ठिकाणी रस्त्यांवर सुरू असलेली खोदकामे, अपूर्ण कामे, खड्डे, अपुऱ्या निचरा व्यवस्थेमुळे पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली. नागरिक, वाहनचालक व पादचारी यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. ‘या अडचणी तातडीने दूर करून भविष्यात अशा समस्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवावेत,’ असा आदेश महापौर रवी लांडगे यांनी दिला.