पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेले आयटी अभियंते, परदेशी उद्योगपती, अधिकारी, खेळाडू आणि नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची गोल्फ कोर्स क्लबची सुविधा निर्माण केली जाणार आहे. मोशीतील रस्ते, वाहनतळ, जलाशय अशी दहा आरक्षणे बदलून तेथील ६१.३८ हेक्टर जागेत गोल्फ कोर्स करण्यात येणार आहे. जुने आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडी, माण, गहुंजे, मारुंजी, जांभे, नेरे आणि सांगवडे या नवीन सात गावांचा समावेश करण्यात येणार आहे. शहरात मोठ्या संख्येने आयटी उद्योगांचा समावेश होणार आहे. तळवडे येथे अनेक आयटी पार्क सुरू आहेत. त्यामुळे शहरात परदेशी उद्योगपती, तसेच अधिकारी व नागरिक कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शहरात मेट्रो मार्गाचा विस्तारदेखील सुरू आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरात गोल्फ कोर्स क्लबसारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा परदेशी व स्थानिक नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात १५ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
उद्योगवाढीस चालना
महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील विविध आरक्षणांसाठी प्रयोजन असलेली पडीक जागा आहे. या जागेत कोणताही वापर सुरू झालेला नाही. या जागांवरील आरक्षणात फेरबदल करून गोल्फ कोर्स क्लब सेवा शहरासाठी उपलब्ध केली जाणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महापालिकेचे नाव होऊन शहरात विविध नवे उद्योगधंदे उभे राहण्यास चालना मिळेल, असा दावा प्रस्तावात केला आहे. सद्य:स्थितीमध्ये मोशी परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, न्यायालय, सीओईपी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आदी प्रकल्पांचे काम सुरू असून, काहींचे प्रस्तावित आहे.
दहा आरक्षणांत बदल
मोशी येथील मंजूर विकास आराखड्यातील जागा गोल्फ कोर्स क्लब निर्माण करण्यासाठी योग्य असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. मोशीतील विविध ६१.३८ हेक्टर जागांवरील रस्ते, वाहनतळ, जलाशय अशी विविध प्रकारची दहा आरक्षणे रद्द करून या सर्व जागांवर गोल्फ कोर्स क्लबचे आरक्षण प्रस्तावित करावे, असा आरक्षणातील फेरबदलाचा प्रस्ताव १५ ऑक्टोबरला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
हरकती, सूचना मागविणार
गोल्फ कोर्स क्लबसाठीचे आरक्षण टाकल्यास त्यावर हरकती व सूचना मागण्यात येणार आहेत. हरकतींवर सुनावणी घेऊन तसा प्रस्ताव राज्य शासनाला मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. त्याचे सर्व अधिकार आयुक्तांना देण्यात येणार आहेत.
