पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे फलक आणि किऑस्क लावणाऱ्या एक लाख २१ हजार २१६ जणांवर आकाशचिन्ह व परवाना विभागाने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत कारवाई करून १३ लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे १,६०० हून अधिक अधिकृत फलक आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणी लग्न, वाढदिवस, स्वागत, निवडणूक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे अनेकदा अनधिकृत फलक लावले जातात. यामुळे शहर विद्रूप हाेते. वाहतुकीसही अडथळा होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या फलकांवर दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या पथकांकडून कारवाई केली जाते. त्याबाबत सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि शहराध्यक्षांना सूचित करण्यात आले असूनही विविध भागांत अनधिकृत जाहिराती लावल्या जातात.
आगामी काळात सण, उत्सव आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, विविध संस्था, संघटना अनधिकृतपणे जाहिरात करण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने कारवाईची कठोर भूमिका घेतली आहे. कोट नागरिकांनी अनधिकृत फलक लावून शहर विद्रूप करू नये. महापालिकेने परवानगी दिलेल्या अधिकृत फलकांवर जाहिरात लावावी. अनधिकृतपणे जाहिरातबाजी केल्यास दंडात्मक कारवाईसह फाैजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी दिला आहे.
कारवाईसाठी एआयचा वापर
अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी कृत्रिम प्रणीलासारख्या (एआय) तंत्रज्ञानाचाही यासाठी वापर केला जात आहे. शहरातील किवळे येथे १७ एप्रिल २०२३ रोजी अनधिकृत हाेर्डिंग काेसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला हाेता. या दुघर्टनेनंतर महापालिकेने शहरातील १७४ अनधिकृत हाेर्डिंग जमीनदाेस्त केले. शहरात सद्य:स्थितीत सुमारे एक हजार ६०० हाेर्डिंग अधिकृत असल्याचा दावा आकाश चिन्ह विभागाने केला आहे.
जीवितहानी झाल्यास हाेर्डिंगधारक जबाबदार
होर्डिंगधारकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करावी, पाया, लोखंडी सांगाड्यास गंज लागला नसल्याची खात्री करावी, त्यास गंजरोधक रंग लावावा. एखादे हाेर्डिंग धोकादायक असल्यास ते तात्काळ काढून घ्यावे. आपल्या मालकीचे हाेर्डिंग वादळ, वारा, जोराची हवा याद्वारे पडणार नाही, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्यानंतरही कोणताही अनुचित प्रकार घडल्यास हाेर्डिंग धारकांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच प्रत्येक हाेर्डिंगवर क्यूआर कोड लावणे बंधनकारक आहे. ज्या हाेर्डिंगवर क्यूआर काेड आणि हाेर्डिंगधारकांची माहिती दर्शविणारी पाटी नसेल असे हाेर्डिंग अनधिकृत समजून कारवाई केली जाईल, असा इशाराही आकाश चिन्ह विभागाने दिला आहे.
