पिंपरी : तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहूमधून वाहणारी आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धेचे स्थान असलेली इंद्रायणी नदी वाॅटर बाॅडी सराेवर पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याचा ४३० काेटींच्या आयत्यावेळी आणलेल्या विषयावरून स्थायी समिती अध्यक्ष आणि विराेधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आयुक्तांनी विषय पत्रावर दीड वाजता स्वाक्षरी केली अन् अडीच वाजता स्थायीत मंजुरी दिली. ‘हा काेणता प्रकार आहे, रितसर विषयपत्रावर विषय का आणला नाही,’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांनी केला. अखेरीस त्यांचा विराेध नाेंदवून विषय मंजूर करण्यात आला.
मावळ तालुक्यातील कुरवंडे गावातून इंद्रायणी नदी उगम पावते. पुढे ती तीर्थक्षेत्र देहूगाव, आळंदीमार्गे तुळापूर येथे जाऊन भीमा नदीला मिळते. भीमा नदी पुढे मुळा मुठा नदीला घेऊन उजनी धरण मार्गे पंढरपूरला जाते. पिंपरी-चिंचवड शहरातून १८.८० किलोमीटर अंतर नदीचे पात्र आहे. नदी शहरात येताच अनेक गटारी, नाले नदीत थेट मिसळतात. त्यामुळे नदीचा रंग बदलू लागतो. निर्मळ पाण्याला नाल्याचे रूप येते. इंद्रायणीत जलपर्णी दिसते. कुदळवाडी नाल्यातून औद्योगिक कंपन्यामधील रसायन मिश्रित पाणी नदीत मिसळते. त्यामुळे महापालिकेने इंद्रायणी नदी वाॅटर बाॅडी सराेवर पुनरुज्जीवन प्रकल्प आखला. त्याला राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाल्यानंतर पर्यावरण विभागाने ४४३ काेटी ५१ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली.या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत आठ ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी तीन ठेकेदारांच्या निविदा पात्र झाल्या. त्यातील एका ठेकेदाराची तीन टक्के कमी दराची निविदा स्वीकारण्यात आली.
या बाबतच्या प्रस्तावाला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी दुपारी एक वाजून ३६ मिनिटांनी मान्यता दिली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता स्थायी समितीसमाेर तात्काळ आयत्यावेळी हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. ४३० काेटींचा विषय रीतसर का आणला नाही, एवढा माेठा विषय आयत्यावेळी आणण्याची घाई का केली, विषयाची माहिती देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, आमदारांचा दूरध्वनी आल्याने आयत्यावेळी विषयाला मंजुरी दिली जात आहे का, असा सवाल विराेधी सदस्यांनी केला. यावरून स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी काेणाचे नाव घेऊ नका, असे म्हणून विराेधकांना सुनावले.
तीन वर्षांत काम पूर्ण करणार
हा प्रकल्प अमृत दाेन योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तीन टप्प्यांत ५० टक्के अनुदान देणार आहे. महापालिकेचा ५० टक्के हिस्सा आहे. प्रकल्पाच्या कामकाची मुदत ३६ महिने निश्चित करण्यात आली आहे. चिखलीतील रिव्हर रेसिडेन्सी आणि स्मशानभूमीजवळ ४० आणि २० दशलक्ष लीटर क्षमतेचे दाेन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत.
पालखी साेहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे नियाेजन आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये आयत्यावेळी इंद्रायणी नदी वाॅटर बाॅडी सराेवर पुनरुज्जीवन प्रकल्पाचा विषय आणला आणि ताे मंजूर करण्यात आला आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्षअभिषेक बारणे यांनी सांगितले.
या निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ झाली आहे. पाच ठेकेदारांना जाणीवपूर्वक अपात्र करण्यात आले आहे. रीतसर विषय आणणे आवश्यक होते. एवढी घाई कशासाठी केली जात आहे. नदीसुधारच्या कामाला विरोध नसून प्रक्रियेला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे म्हणाले.
