पिंपरी : ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी- चिंचवड शहर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात या शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी हा चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरणार असून, शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरेल’, असा विश्वास महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी, गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे महापौर लांडगे यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके, अभिनेता क्षितिज दाते, विजय चौधरी यावेळी उपस्थित होते. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात गुरुवारपर्यंत (५ मार्च) हा महोत्सव चालणार आहे.

‘चित्रपट महोत्सवातून शहरातील कलाकार घडतील. शहराची सांस्कृतिक जडणघडण होण्यास मदत होईल’, असा विश्वास व्यक्त करून लांडगे म्हणाले, ‘मी स्वतः कलारसिक असून, चित्रपट पाहण्याचा छंद आहे. चित्रपटामध्ये आपण स्वतःला पाहत असतो. आपलेच एक कथानक रूपेरी पडद्यावर पाहताना आपण चित्रपटाशी समरस होत जातो.

चित्रपट ताणतणाव घालवण्यासाठी उपयुक्त असतो. तसेच, आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी चित्रपट हे माध्यम खूप उपयुक्त आहे. या माध्यमातून सकारात्मक जीवन घडवण्यासाठी मदत होत असते. चित्रपटासारख्या कलाकृती पाहिल्यामुळे जीवनात एक सकारात्मक बदल घडतो. शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भव्य-दिव्य स्वरूपात आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. येत्या काळात शहराची सांस्कृतिक उंची वाढवण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत राहील’.

पिंपरी-चिंचवड सांस्कृतिक उपराजधानी

‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम पाहता पिंपरी-चिंचवड आता महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील स्थानिक कलाकारांना जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध होत आहे,’ भोईर म्हणाले. कलाकार घडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर पोषक आहे. नागरिकांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसारख्या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले पाहिजे. चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी नसून, ते प्रबोधनाचे एक माध्यम आहे. चित्रपट क्षेत्रात करिअर चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यासाठी या क्षेत्रातील सखोल ज्ञान घेऊन त्यामध्ये पदार्पण करणे गरजेचे आहे, असे दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले.