पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील आदेश्वर जैन मंदिरात पुजाऱ्याच्या वेशात आलेल्या एका चोरट्याने मंदिरातील मूर्तीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने अवघ्या दोन दिवसात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला मुंबई मधून अटक केली. त्याच्याकडून चांदीचा मुकुट जप्त केला आहे.
नरेश अगरचंद जैन (वय ४९, रा. भगत बिल्डिंग, भुलेश्वर, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन परिसरात आदेश्वर जैन मंदिर आहे. भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ यांच्या मूर्तीला एक किलो चांदीचा अडीच लाख रुपये किमतीचा मुकुट आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती पुजाऱ्याचा वेष घेऊन मंदिरात आली. त्या व्यक्तीने मूर्तीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरी केला.

काही वेळाने मंदिरातील पुजारी आणि व्यवस्थापनाच्या लक्षात आले कि, मूर्तीचा मुकुट जागेवर नाही. त्यानंतर मंदिरातील पुजारी आणि व्यवस्थापनाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता पुजाऱ्याच्या वेशात आलेल्या अनोळखी व्यक्तीने हा मुकुट चोरून नेला असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एककडून केला जात होता. पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुलीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली. पथकांनी चिंचवड परिसरातील २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याचा शोध घेत त्याला अवघ्या दोन दिवसात मुंबई मधून अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरी केलेला मुकुट हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी नरेश जैन याच्या विरोधात मुंबई मधील मलबार हिल, डीपी रोड, घाटकोपर, एलटी मार्ग, डोंबिवली, आर ए के, नागपाडा, आझाद चौक, सायन पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुलीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सहायक उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल उषा दळे, अजय डगळे, महादेव जावळे, जयवंत राऊत, देवा राऊत, शिवराम भोपे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, केशव चेपटे, सोहेल चिखलकर, उद्धव खेडकर यांनी केली.
