पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एकट्या राहणाऱ्या वृद्धांकरिता पोलिसांनी ‘ज्येष्ठानुबंध’ ॲप विकसित केले आहे. अशा ज्येष्ठांच्या मदतीसाठी या ॲपच्या माध्यमातून पोलीस २४ तास उपलब्ध राहणार असून, त्यांच्याशी संवाद साधणे, प्रसंगी किराणा माल, औषधे आणून देणे, तसेच नुसता संवाद करणे अशीही मदत करण्यात येणार आहे.

‘ज्येष्ठांचा सन्मान, पोलिसांचा मान’ या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हे विशेष ॲप सुरू केले आहे. वयोवृद्धांच्या गरजा लक्षात घेऊन, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

‘परदेशात किंवा दूरच्या शहरात स्थायिक झालेल्या शहरातील तरुणांच्या वृद्ध आई-वडिलांना वय वाढल्याने दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर साथ देत नाही. आजारपणात कोणी जवळ नसते. किराणा, औषधे घ्यायला कोणी सोबत नसते. संवादाचाही अभाव जाणवतो. हळूहळू हे पालक मानसिकदृष्ट्या एकटे पडू लागतात. घर आहे, पण आपली माणसे नाहीत; मोबाइल आहे, पण फोन येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात एकटेपणाची जाणीव अधिक तीव्र होते. त्यासाठी हे ॲप सुरू केले आहे,’ असे पोलिसांनी सांगितले.

‘‘ज्येष्ठानुबंध’ ॲपची माहिती स्थानिक पोलिसांनी आपल्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधून दिली असून, आतापर्यंत २५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी यावर नोंदणी केली आहे. ही सेवा २४ तास विनामूल्य उपलब्ध आहे,’ असे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी सांगितले.

ॲपमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या परिसरातील रुग्णालयांची नावे, रुग्णवाहिका सेवा आणि तातडीच्या मदतीसाठी लागणारे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. त्यामुळे संकटाच्या वेळेस सहज मदत मिळू शकेल. या ॲपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या विनंत्यांचे विश्लेषण करून त्यांच्या गरजांनुसार त्वरित आणि अचूक सेवा देता येणार आहे.

स्वतंत्र कक्ष करणार मदत

‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रमासाठी पोलीस आयुक्तालयात एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. अनुभवी पोलीस अंमलदार आणि अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा, तक्रारी आणि विनंत्यांवर तत्काळ प्रतिसाद देणे, हे त्यांचे मुख्य काम असणार आहे. ज्यांना औषध, किराणा आणण्यासाठी जाता येत नाही, त्यांना पोलीस साहित्य आणून देणार आहेत. वरिष्ठ अधिकारी कक्षाच्या कामकाजाचा दररोज आढावा घेणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून वेळेवर मदत पोहोचवणे हा ‘ज्येष्ठानुबंध’ ॲपचा मुख्य उद्देश आहे. – विनयकुमार चौबे,पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड