पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील मशिदी, मंदिरांसह ११ अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईवर आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी फेसबुकवर आपली सविस्तर प्रतिक्रिया पोस्ट केली आहे.

महेश लांडगे नेमकं काय म्हणाले?

आमदार महेश लांडगे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘राष्ट्र सुरक्षा’ आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतातील सर्वांत मोठी अतिक्रमण कारवाई पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने या ऐतिहासिक कारवाईमध्ये सुमारे एक हजार एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त आणि भंगार दुकानेमुक्त केले होते. विशेष म्हणजे, बेकायदेशीरपणे प्रार्थनास्थळे उभारुन धार्मिक प्रचार-प्रसार करणे, हिंदू धर्मियांबाबत द्वेष तयार करुन जिहादी प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या अनधिकृत मशिदी, दर्गा आणि मदशांवर कारवाई करावी, यासाठी आम्ही विधानसभा आणि प्रशासकीय पातळीवर सातत्त्याने मागणी लावून धरली होती. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवली. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री आणखी ५ बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईचे आम्ही स्वागत करतो.

अतिक्रमण करुन उभारलेल्या मशिदी… मदरसा म्हणजे… लँड जिहाद आहेत… यातूनच देशविघातक शक्तींना बळ दिले जाते. लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, व्होट जिहाद अशा प्रवृत्तींच्या बेकायदेशीर आश्रयस्थळांना कदापि अभय दिले जाणार नाही. कारण, हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. या धडक कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. कारवाईमध्ये काही समाजकंटकांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली, असे समजले. पोलीस प्रशासनाने पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. या करिता जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासन काम करीत आहे. विनाकारण तणावाचे वातावरण करण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. हे देवाभाऊंचे सरकार आहे. चुकीच्या कामाला कदापि थारा दिला जाणार नाही.

कुदळवाडीत नेमके काय झाले होते?

नऊ जून रोजी कुदळवाडी, चिखलीतील मध्यरात्री मशिदी, मंदिरासह ११ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री महापालिकेचे पथक मोठा फौजफाटा घेऊन कुदळवाडीत दाखल झाले. एक ते तीन या वेळेत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये २८००१ चौरस फूट क्षेत्रफळाची ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले असून सहा जणांना किरकोळ मुकामार लागला आहे.

वर्षभरापासून कुदळवाडी रडारवर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये कुदळवाडीत मोठी कारवाई केली होती. ८५० एकरवर असलेल्या अनधिकृत गाेदामे, पत्राशेड, भंगार दुकानांवर हातोडा चालविला होता. सलग १५ दिवस ही कारवाई सुरू होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये चिखली, रिव्हर रेसिडन्सी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील सात हजार २४५ चौरस मीटर भूभागावरील ६३ हजार ९७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ३६ अनधिकृत बंगले, घरे महापालिकेने एकाच दिवसात जमीनदाेस्त केली होती. मागील महिन्यात ११ मे रोजी महापालिका प्रशासनाने कुदळवाडीतील अनधिकृत असलेल्या दोन मंदिरे आणि मशिदींवर कारवाई केली होती.