पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मौजे चिखली, कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर ९ जून रोजी मध्यरात्री पुन्हा कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत तीन मशिदींवर आणि चार मंदिरावर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये कुदळवाडीत मोठी कारवाई केली होती. ८५० एकरवर असलेल्या अनधिकृत गाेदामे, पत्राशेड, भंगार दुकानांवर हातोडा चालविला होता. सलग १५ दिवस ही कारवाई सुरू होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये चिखली, रिव्हर रेसिडन्सी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील सात हजार २४५ चौरस मीटर भूभागावरील ६३ हजार ९७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ३६ अनधिकृत बंगले, घरे पिंपरी-चिंचवड महापालिकेने एकाच दिवसात जमीनदाेस्त केली होती.

मागील महिन्यात ११ मे रोजी महापालिका प्रशासनाने कुदळवाडीतील अनधिकृत असलेल्या दोन मंदिरे आणि मशिदींवर कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा ९ जून रोजी मध्यरात्री तीन मशिदींवर आणि चार मंदिरावर कारवाई करण्यात आली आहे. ९ जून रोजी मध्यरात्री महापालिकेचे पथक मोठा फौजफाटा घेऊन कुदळवाडीत दाखल झाले. बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, धडक कारवाई पथकातील क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि एमएसएफ जवान कारवाईवेळी उपस्थित होते.