पिंपरी : प्रेमविवाह मान्य नसल्याने तरुणावर त्याच्या पत्नीच्या भावांनी पिस्तूल आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना पिंपळे निलख येथे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. आरोपींच्या हातातून पिस्तूल खाली पडल्याने तरुण बचावला.

या प्रकरणी दोन जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या हल्ल्यात तरुणासह तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी हे मित्र असून एका व्यवसायात भागीदारही होते. घरी येणे-जाणे असल्याने तरुणाचे आरोपींच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आरोपींच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. चार महिन्यांपूर्वी तरुणाने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्याचा आरोपींना राग होता. मंगळवारी दुपारी तरुण कामानिमित्त बाहेर निघाला असताना घराजवळच आरोपींनी तरुणावर पिस्तूल आणि कोयत्याने हल्ला केला. मात्र, हल्ल्यादरम्यान पिस्तूल हातातून खाली पडल्याने तरुण बचावला. या घटनेत तरुणाला वाचवण्यासाठी आलेले त्याचे दोन भाऊ जखमी झाले. तिघा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सांगवी पोलीस तपास करीत

मित्रावर लाकडी दांडक्याने हल्ला

काम असल्याचे सांगून बोलावून एका तरुणाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत करण्यात आली. ही घटना रविवारी (६ सप्टेंबर) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अजंठानगर येथे घडली.याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र असलेला आरोपी याने फिर्यादीला “तुझ्याकडे काम आहे” असे सांगून बोलावले आणि शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या आरोपी याने त्याच्या दुचाकीतून लाकडी दांडका काढून आरोपीकडे दिला. त्या दांडक्याने फिर्यादीच्या दोन्ही पायांच्या नडगीवर आणि गुडघ्यावर मारून गंभीर दुखापत केली आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

पॉपी स्ट्रॉ वाहतूक प्रकरणी तरुणास अटक

दुचाकीवरून बेकायदेशीरपणे अफूच्या सुकवलेल्या बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी कारवाईत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (७ सप्टेंबर) ताथवडे येथे करण्यात आली.

पोलीस शिपाई अमर राणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेवतराम घेवरराम चौधरी (२५, ताथवडे, मूळ रा. नागौर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने डांगे चौकाकडून रावेतकडे जाणाऱ्या मार्गावर संशयित आरोपीला थांबवले. त्याच्या ताब्यातील दुचाकीची झडती घेतली असता, त्याच्याकडे १३ हजार ३०५ रुपये किमतीचा ८८७ ग्रॅम वजनाचा पॉपी स्ट्रॉ हा अमली पदार्थ बेकायदेशीरपणे बाळगल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून वाकड पोलीस तपास करत आहेत.