पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरांसाठी निगडी प्राधिकरणात अधिकृत निवासस्थान (बंगला) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. महापौरांसाठी निवासस्थान उभारण्याकरिता निगडी, प्राधिकरणातील जागा आरक्षित आहे. प्राधिकरणातील सेक्टर २७ येथे महापौर निवासस्थानाचे बांधकाम करण्याबाबाबत महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापौर निवासस्थान उभारण्याचे नियोजन आहे. या कामासाठी २०२६-२७ च्या सुधारित अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. त्यासाठी स्थानिक संस्था कर परताव्याच्या लेखाशीर्षवरील पाच कोटींमध्ये घट केली आहे.

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ९० लाखांची मदत

मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या नातेवाइकांना महापालिकेकडून दहा लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी दहा लाख याप्रमाणे ९० लाख रुपये देण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. त्यासाठी आपत्तीग्रस्त नागरिकांना आर्थिक साहाय्य या लेखाशीर्षावर तरतूद वाढविण्यात आली.

विद्युत बस धावणार

शहरातील बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) आणि उच्च क्षमता द्रुतगती मार्गावर (एचसीएमटीआर) तीन डब्यांची विजेवर चालणारी ‘ईआरटीएस’ बस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रॉन्झिट सिस्टीम) सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भोसरीतील गोडाऊन चौक-कुदळवाडी चौक-ऑटो क्लस्टर-काळेवाडी फाटा-जगताप डेअरी- वाकड चौक या १७ किलोमीटर मार्गावर विद्युत बस धावणार असून, त्याचा आराखडा करण्यास मान्यता देण्यात आली.

सशुल्क वाहनतळ धोरणाला मान्यता

शहरातील काही प्रमुख रस्त्यासाठी आणलेले सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क) धोरण गुंडाळल्यानंतर आता संपूर्ण शहरासाठी नव्याने वाहनतळ धोरण निश्चित केले आहे. रस्त्यालगत, रस्ताबाह्य पार्किंगचे नियोजन केले असून, यासाठी ‘टेलिस्कोपिक’ शुल्क रचना, पार्किंग पास व निवासी पार्किंगनुसार शुल्क निश्चित केले आहे. या बाबतच्या सशुल्क वाहनतळ धोरणाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

इमारतीचे नामकरण

‘वायसीएम’ रुग्णालयात ६० विद्यार्थी क्षमतेचे बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या ११ मजल्यांच्या नवीन इमारतीस ‘वायसीएम विद्यासदन’ असे नाव देण्यात आले आहे.