पिंपरी :  पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे हे स्वीय सहाय्यकासह पुढील महिन्यात अझरबैजान दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या सदस्य प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

संयुक्त राष्ट्र मानव वस्ती कार्यक्रमांतर्गत (यूएन-हैबिटैट) वर्ल्ड अर्बन फोरमचे दर दोन वर्षांनी संमेलन होते. शहरी विकासाशी संबंधित जागतिक स्तरावरील महत्त्वाचा मंच अशी त्याची ओळख आहे. फोरमचे १३ वे अधिवेशन १७ ते २२ मे दरम्यान अझरबैजानची राजधानी बाकू येथे होत आहे. त्यासाठी महापौर रवी लांडगे व स्वीय सहाय्यक अभय चौगुले उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी आठ लाख ८० हजार २८१ रुपये खर्च अपेक्षित आहे. तो नगरसचिव विभागाकडील ‘प्रशिक्षण सन्माननीय नगरसदस्य’ लेखाशिर्षातील २०२६-२७ च्या ५० लाख रुपये तरतूदीमधून केला जाणार आहे. त्यास स्थायी समिती सभेने बुधवारी मान्यता दिली.

कचरा गाडीवर व्हीटीएम यंत्रणा

कचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व्हीटीएम यंत्रणा बसविणे तसेच त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यास, जुनी सांगवी परिसरातील रुग्णालयाच्या स्थापत्य दुरुस्ती व अनुषंगिक कामांस मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य विभागामार्फत स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक खर्चास मंजुरी देण्यात आली.

वाकड परिसरात पावसाळी वाहिनी टाकणार

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पश्चिमेकडील वाकड, पुनावळे, ताथवडे व इतर भागांमध्ये पावसाळी पाण्याच्या वाहिनीची दुरुस्ती करणे, आवश्यकतेनुसार नवीन वाहिनी टाकणे व स्थापत्य विषयक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक २९ पिंपळेगुरव येथील घाटावर स्थापत्य विषयक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक २६ कस्पटे वस्ती, वेणूनगर, कावेरीनगर व इतर परिसरांमध्ये फुटपाथ, पेव्हिंग ब्लॉकची देखभाल व दुरुस्ती तसेच स्थापत्य विषयक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.

ताळेबंदपत्रकाचे लेखापरीक्षण

महापालिकेच्या ताळेबंदपत्रकाचे लेखापरीक्षण करण्यासाठी सनदी लेखापाल नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. क व ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत गांधीनगर, बालाजीनगर, संजय गांधीनगर व इतर झोपडपट्टी परिसरांमध्ये गटार करणे, स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे व स्थापत्य विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील आकुर्डी माध्यमिक विद्यालयातील एमएस-सीआयटी केंद्रासाठी फर्निचर खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सन २०२५-२६ साठी किवळे व रावेत येथील उंच पाण्याच्या टाकीच्या जलक्षेत्रात नव्याने विकसित होणाऱ्या भागांसाठी नवीन जलवाहिनी टाकणे व अनुषंगिक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.