पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात जुन्या नकाशांमध्ये दर्शविलेले अनेक नाले कंपन्यांकडून बुजविले आहेत. काही नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एमआयडीसी, महापालिका अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करून अतिक्रमित व बुजविलेले नाले तत्काळ ओळखून कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
एमआयडीसी परिसरातील नाल्यांची सद्य:स्थिती, त्यावरील अतिक्रमणे तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा आढावा आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी घेतला. एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, कार्यकारी अभियंता संजय कोतावाड, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, अतुल पाटील, पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड या वेळी उपस्थित होत्या.
शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या नकाशांमध्ये दर्शविलेले अनेक नाले कंपन्यांकडून बुजविण्यात आले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणांमुळे नैसर्गिक जलप्रवाहांना अडथळा होत असून, पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि उद्योग तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
एमआयडीसी परिसरातील नाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि बुजविण्याच्या प्रकारांमुळे नैसर्गिक जलप्रवाह बाधित होत असून, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे बुजविलेले किंवा अतिक्रमित नाले तसेच पाणी साचणारी ठिकाणे तत्काळ ओळखून त्यांची नोंद घेण्यात यावी. जुन्या नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. ज्या ठिकाणी शक्य नाही तेथे पर्यायी स्वरूपात पावसाळी वाहिनी टाकण्याची कारवाई करण्याची सूचना आयुक्तांनी केली.
अनधिकृत नळजोड, पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई
नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे पाणी साचण्याची समस्या गंभीर बनते. त्यामुळे अशा बांधकामांवर तातडीने कारवाई करावी. त्याचबरोबर अनधिकृत नळजोड, ओव्हरहेड वायर, पदपथावरील अतिक्रमण, शहर विद्रुप करणारे होर्डिंग, फलक, जाहिरातींवरही कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले.
आतापर्यंत ४७.३४ टक्के नालेसफाई पूर्ण
शहरात १४५ नाले आहेत. या ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. यापैकी आतापर्यंत ४७.३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. नाल्यावर अतिक्रमण करणे ही गंभीर बाब असून, यामुळे संपूर्ण परिसराच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. नाल्यांवर अतिक्रमण केलेल्या किंवा नाले बुजविलेल्या कंपन्यांनी अतिक्रमण काढून नाले पूर्वस्थितीत आणावेत, असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
