पिंपरी : अमेरिका आणि इस्रायलच्या इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धाची मोठी झळ उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना बसली आहे. युद्ध लांबल्यास लघु, सूक्ष्म उद्योगांना मोठा फटका बसण्याची भीतीही उद्योजकांनी व्यक्त केली. सध्या पक्क्या मालाची निर्यात आणि कच्च्या मालाची आयात ठप्प झाल्याने उत्पादन घटले आहे.
पिंपरी-चिंचवड ‘एमआयडीसी’त सद्य:स्थितीत बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे सुमारे १६ हजार सूक्ष्म आणि लघुउद्याेग सुरू आहेत. या १६ हजार उद्योगांमुळे सात लाख कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. वाहनांचे सुटे भाग (ऑटोमोबाइल पार्ट्स), संरक्षण विभागाला लागणारे सुटे भाग, प्रेस पार्ट, रबर, प्लास्टिक, मशिनरी, इंजिनीअरिंग कंपन्यांसाठीचे फॅब्रिकेशन आदींचे या लघु उद्योगांत उत्पादन होते. शहरातील मोठ्या उद्योगांसह विदेशातील उद्योगांनाही हे सुटे भाग पुरविले जातात. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, नेपाळ, अरब राष्ट्रांमध्ये निर्यात होते, तर पॉलिमर, प्लास्टिक आणि इतर रसायनांसाठीचा कच्चा माल कतार, इराण, सौदी अरेबिया या देशांमधून आयात केला जातो.
उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून जहाजातून या मालाची आयात-निर्यात होते. मात्र, २८ फेब्रुवारीपासून ‘एमआयडीसी’तील लघुउद्योजकांना पेंट, कोटिंग्ज, केमिकल, तसेच ऑटोमोबाइल घटक उद्योगांना कच्चा माल मिळणे कठीण झाले आहे. पैसे भरूनही कच्चा माल उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती आहे. भारतातील पुरवठादारांनी कच्च्या मालाच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. परिणामी, प्लास्टिक वस्तू तयार करणाऱ्या लघु, मध्यम उद्योगांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. दुसरीकडे, निर्यातही पूर्णपणे ठप्प आहे. पक्का माल कंपन्यांमध्ये पडून आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी निर्यात केलेल्या मालाचे जहाज कोठे अडकले याची कोणतीही माहिती नाही. निर्यातीवर अवलंबून असलेल्यांनी उत्पादन थांबविले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काळात कच्च्या मालाचा तुटवडा अधिक तीव्र होण्याची शक्यता उद्योजकांकडून वर्तविली जात आहे.
कामगारांनाही फटका
आयात-निर्यात बंद झाल्याने कंपन्यांनी उत्पादनात घट केली आहे. त्याचा फटका कामगारांनाही बसू लागला आहे. कामाची नियमित आठ तासांची पाळी (शिफ्ट) सुरू आहे. पण, उद्योगांनी ओव्हर टाइम बंद केला आहे. त्यामुळे कामगारांना आर्थिक फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.
उद्योगांपुढचे प्रश्न…
– युद्ध सुरू होण्यापूर्वी निर्यात केलेल्या मालाचे जहाज कोठे अडकले, याची कोणतीही माहिती नाही.
– युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने पॉलिमर, प्लास्टिक आणि रसायनांच्या कच्च्या मालाच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
– कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या उद्योगांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
लघुउद्योजक आखाती देशासह युरोप, अमेरिकेत पक्का माल पाठवितात. युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास, अलॉय स्टील हा कच्चा माल उपलब्ध होत नाही. त्यामुळे उत्पादन घटले आहे. काम नसल्याने उद्योजकांनी कामगारांची कामाची वेळही कमी केली आहे. निर्यातीवर अवलंबून असलेल्यांनी उत्पादन थांबविले आहे. उद्योजकांचे किती नुकसान झाले आहे, याची नेमकी आकडेवारी काढण्याचे काम सुरू असल्याचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
प्लास्टिक उत्पादनासाठीचा कच्चा माल कतार, इराण, सौदी अरेबियातून येत होता. तो ठप्प झाला आहे. भारतातील पुरवठादारांनी कच्च्या मालाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. पॉलिमर, प्लास्टिक आणि रसायने उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कच्च्या मालाचे दर वाढत असल्याने उत्पादन करावे की नको, या संभ्रमावस्थेत उद्योजक आहेत. युद्ध लांबल्यास प्लास्टिक उत्पादनांची निर्मिती महाग होईल, अशी भीती पिंपरी-चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गट्टानी यांनी सांगितले.
रशिया, युक्रेनमधून येणारा कच्चा माल बंद झाला आहे. ॲल्युमिनियमच्या किमती वाढल्या आहेत. गॅसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोटिंग्जची प्रक्रिया रखडली आहे. उत्पादन थांबले आहे. उद्योग ठप्प झाले असून, कामगारांना मात्र पगार द्यावा लागणार आहे. पुढील काही महिन्यांत युद्धाचे उद्योगांवर झालेले विपरीत परिणाम दिसून येतील, असे उद्योजक अतुल इनामदार यांनी सांगितले.
