पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, घातक कचरा व्यवस्थापन तसेच लघुउद्योगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. उद्योगधंद्यांना सक्षम, सुरक्षित आणि विकासपूरक वातावरण उपलब्ध करून दिले जाईल,’ अशी ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लघुउद्योजकांना दिली.

औद्योगिक क्षेत्रासमोरील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास आणि प्रशासकीय समन्वय या संदर्भात महापालिकेत मंगळवारी आढावा बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, मनोज सेठिया, उपायुक्त सीताराम बहुरे, व्यंकटेश दुर्वास, सहायक आयुक्त तानाजी नरळे, अतुल पाटील, अजिंक्य येळे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, फोरम फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

बेलसरे यांनी औद्योगिक क्षेत्रासमोरील विविध समस्या, प्रलंबित प्रश्न तसेच एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांबाबतच्या मागण्या मांडल्या.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी एमआयडीसी परिसरात नियोजनबद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या. तसेच, कचरा विलगीकरण, वेळेत कचरा संकलन आणि दैनंदिन स्वच्छता मोहिमेवर विशेष भर देत परिसर अधिक स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्याचे निर्देश दिले.

लवकरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत एमआयडीसी परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून समस्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. औद्योगिक भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्त रस्ते, सुकर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षित औद्योगिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येईल. घातक कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबतही सकारात्मकमपणे विचार केला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

उद्योगांच्या समस्यांसाठी महिन्याला बैठक

उद्योग क्षेत्राच्या समस्या प्रलंबित राहू नयेत यासाठी दर महिन्याला नियमित आढावा बैठक घेण्यात येईल. ‘उद्योग सारथी’ या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योग संघटना आणि प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद ठेवून स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल. शहरातील उद्योगवाढीस गती देण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.