पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ६० कोटी रुपयांच्या उपसूचना घोटाळा प्रकरणात अखेर राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवी मुंबई महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी सत्यवान उबाळे यांची ‘वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.
महापालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात किंवा विकासकामांच्या नियोजनात ऐनवेळी कोट्यवधी रुपयांच्या उपसूचना घुसडून विशिष्ट कंत्राटदारांना आणि हितसंबंधियांना आर्थिक फायदा पोहोचवण्याचा डाव आखला गेला होता. हा संपूर्ण भ्रष्टाचार स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी अत्यंत आक्रमकपणे बाहेर काढला. बारणे यांच्याकडे जेव्हा ६० कोटींच्या वाढीव निधीच्या उपसूचना मंजुरीसाठी आल्या, तेव्हा या फाईल्समधील तांत्रिक आणि आर्थिक तरतुदी संशयास्पद वाटल्याने त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली.
तपासणी दरम्यान बारणे यांनी प्रशासकीय मंजुरीचे कोणतेही ठोस निकष नसताना आणि आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध नसतानाही या ६० कोटींच्या फाईल्स नियमबाह्य पद्धतीने मंजुरीसाठी पुढे सरकवण्यात आल्याचे उघड केले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी या नात्याने प्रवीण जैन यांनी या नियमबाह्य कामाला आक्षेप घेणे अपेक्षित असताना, त्यांनी कंत्राटदारांच्या फायद्यासाठी या फाईल्स मंजूर करून घेण्यामध्ये मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावली. अभिषेक बारणे यांनी हा भ्रष्टाचाराचा प्रकार केवळ स्थायी समितीतच रोखला नाही, तर या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे गोळा करून राज्य सरकार आणि वित्त मंत्रालयाकडे जैन यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली व त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
बारणे यांनी पुराव्यांसह केलेल्या या तक्रारीनंतर मंत्रालयामार्फत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. महापालिकेच्या आर्थिक शिस्तीचे रक्षण करण्याऐवजी भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि वित्त मंत्रालयाने जैन यांना पदावरून हटवण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे बारणे यांनी सांगितले.
शासन आदेशानुसार, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवी मुंबई महापालिकेत मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सत्यवान उबाळे यांची बदली आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. ६० कोटींच्या या प्रकरणानंतर आता पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण जबाबदारी उबाळे यांच्याकडे असणार आहे.
शासनाने आपल्या आदेशात स्पष्ट निर्देश दिले आहेत की, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या जागी त्वरित रुजू व्हावे. सध्याच्या नियंत्रक अधिकाऱ्यांनी बदलीस पर्यायी अधिकारी यायची वाट न पाहता, स्थानिक व्यवस्था करून संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ कार्यमुक्त करावे, जेणेकरून प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही.
