पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आल्याने फज्जा उडाल्यानंतर महापालिका प्रशासनाने नालेसफाईला वेग दिला आहे. साेमवारअखेर ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून ३१ मेपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मोठ्या आकाराच्या नाल्याच्या साफसफाईसाठी ‘स्पायडर मशिन’ उपलब्ध होत नसल्याने कामास विलंब झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
शहरात एप्रिल महिन्यात नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले होते. सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या आरोग्य विभागाकडून नालेसफाईचे काम केले जात आहे. शहरात लहान व मोठे असे एकूण १४१ नाले आहेत. या नाल्यांची एकूण लांबी ९१.५ किलोमीटर इतकी आहे. साेमवारअखेर नालेसफाईचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे.
शहरातील मोठ्या आकाराच्या नाले सफाईचे काम शिल्लक आहे. त्यासाठी स्पायडर मशिनची कमतरता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकाच ठेकेदाराकडे पाच स्पायडर मशिन आहेत. त्यामधील पिंपरी महापालिकेस केवळ दोन स्पायडर मशिन उपलब्ध झाल्या आहेत. त्याद्वारे सध्या काम सुरू आहे. ‘इ’, ‘फ’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ९० टक्यांपुढे नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित मोठ्या नाल्यांची सफाई स्पायडर मशिनने केली जात आहे. या कामाला वेग देण्यात आला आहे. ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ आणि ‘ग’ या क्षेत्रीय कार्यालयांतील नालेसफाईचे काम संथगतीने सुरू आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाण्याचा निचरा हाेण्यास अडथळा
शहरातील विविध भागांत विकासकामे सुरू आहेत. खोदकाम, पेव्हिंग ब्लॉक, काँक्रिटीकरणाची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. या कामांमध्ये पाण्याचा नैसर्गिक उताराचा विचार न केल्याने पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. नाल्यांमधील गाळ काढला असता, तरी रस्ते कामांमधील नियोजनशून्यता, सांडपाणी आणि पावसाळी पाणी वाहिनीशी योग्य जोडणी न केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नसल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले.
राडारोडा नाल्यात
रस्त्यांच्या दुभाजकांच्या बाजूला तसेच, रस्त्यांच्याकडेला उघडे नाले आहेत. खोदकाम केल्यानंतर राडारोडा, दगड व माती नाल्यात टाकली जाते. त्यामुळे त्यातून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण हाेत आहेत. दापोडी ते निगडी या पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर बीआरटी मार्गात भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. ते काम करताना दुभाजकाशेजारी असलेला उघडा नाला माती टाकून बुजविण्यात आला आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावर पाणी साचून राहते.
| क्षेत्रीय कार्यालय | नालेसफाईची टक्केवारी |
|---|---|
| अ | ८९.१२% |
| ब | ७१.२०% |
| क | ७९.७३% |
| ड | ७६.३६% |
| इ | ९६.७५% |
| फ | ९३.६१% |
| ग | ८८.११% |
| ह | ९१.८३% |
| एकूण | ८५.८४% |
पावसाळ्यापूर्वी सर्वच नाल्यांची साफसफाई करण्यात येत असून ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मोठ्या नाल्यांसाठी सफाई स्पायडर मशिनशिवाय करता येत नाही. उपलब्ध स्पायडर मशिनद्वारे अंतिम टप्प्यातील काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. ३१ मे अखेर शंभर टक्के काम पूर्ण केले जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
