पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत ढासळल्याच्या दुर्घटनेत कचऱ्याखाली दबलेल्या आठ जणांच्या शोधासाठी चौथ्या दिवशीही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य राबविण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. आता इमारतीभोवतालचा मलबा हटवून जवानांना आतमध्ये प्रवेश करण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्यात येत आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रिटचा भाग फोडण्यात येत आहे.

मोशी दुर्घटनेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या नऊ कामगारांची बुधवारी सुखरूप सुटका करण्यात आली. गुरुवारी सकाळी एकाचा मृतदेह हाती आला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या आठ कामगारांना बाहेर काढण्यासाठी चौथ्या दिवशीही बचाव कार्य राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), महापालिकेचे अग्निशामक दल आणि पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव कार्य राबविण्यात येत आहे. मात्र, अद्याप आठ जणांचा शोध लागलेला नाही.

इमारतीच्या बाजूचा मलबा हटविण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि डंपरचा वापर केला जात आहे. इमारतीत अडकलेल्यांच्या जीविताची दक्षता घेऊन काळजीपूर्वक ही मोहीम हाताळली जात आहे. बचाव कार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री कार्यरत आहे. घटना घडून जवळपास ४५ तासांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे जलद गतीने मोहीम राबवून इमारतीत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

बचावलेल्या कामगारांकडून माहिती घेऊन मार्ग

इमारतीच्या समोरील बाजूने प्रवेश करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, मागील बाजूने इमारतीत प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणचा मलबा हटवून सुरक्षित मार्ग तयार करण्यात येत आहे. या इमारतीत अडकलेल्या ज्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन आत अडकलेले नागरिक नेमके कोणत्या जागी अडकले आहेत. त्या जागेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार बचाव कार्याला गती देण्यात आल्याचे ‘एनडीआरएफ’चे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी सांगितले.

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रिट भाग फोडण्यासाठी अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी आणण्यात आले आहे. या मशीनद्वारे दुर्घटनाग्रस्त इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्यासाठी तसेच इमारतीत सुरक्षित प्रवेश करण्याकरिता मार्ग तयार करण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येणार असून मोहीम जलद गतीने अविरतपणे सुरू आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रिट भाग फोडण्यासाठी आणखी एक अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी आणण्यात आले आहे.