पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून तीन मजली ढासळल्याच्या दुर्घटनेत अद्यापही आठ कामगार कचऱ्याखाली दबले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी गुरुवारीही प्रशासनाकडून बचावकार्य सुरू राहिले. आतापर्यंत २४ तासांहून अधिक काळ बचावकार्य राबवून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर एका कामगाराचा मृतदेह हाती लागला.
दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), महापालिकेचा अग्निशमन विभाग आणि पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेत अडकलेल्या सहा कामगारांना बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री दीड वाजेपर्यंत विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत या तीन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास भावेश वाणी यांचा मृतदेह हाती लागला.
‘इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही आठ जण अडकलेले आहेत. त्यामध्ये महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजित पाटील, नागेश गायकवाड आणि वामन कसबे या कामगारांचा समावेश आहे. मोठी यंत्रे लावून इमारत बाजूला घेणे धोकादायक असून, त्यामुळे संपूर्ण इमारत कोसळून अडकलेल्या व्यक्तींच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी, ब्रोकलेनच्या साहाय्याने इमारतीच्या एका बाजूला भोक पाडून जवान आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. आत मोठ्या प्रमाणावर कचरा आहे. अडकलेल्या व्यक्तींना काही इजा होऊ नये, या दृष्टीने बचाव कार्य राबविण्यात येत आहे,’ असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
परिस्थितीनुसार बचावकार्याचे नियोजन
‘घटनास्थळावरील कचरा हटविण्यात येत आहे. तो डंपरमध्ये भरून दुसरीकडे टाकला जात आहे. त्यानंतर आतमध्ये कसे जाता येईल, याचा अंदाज घेता येईल. परिस्थितीनुसार, बचाव कार्याचे नियोजन बदलत आहे. शोधकार्य पूर्ण होण्यास आणखी एक दिवस लागू शकतो,’ असे अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.
बचाव पथकालाही ऑक्सिजन
कोसळलेल्या इमारतीमध्ये ओला कचरा, माती, पाणी जमा झाले आहे. त्यामुळे कचऱ्यातील मिथेन वायू इमारतीत पसरला आहे. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जे जवान जात आहेत, तेदेखील अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ आतमध्ये थांबू शकत नाहीत. जे जवान आत गेले आहेत, त्यांना अर्ध्या तासात बाहेर काढून ऑक्सिजन द्यावा लागत आहे.
दुर्घटनेच्या चौकशीची मागणी
‘मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त कार्यालयीन इमारत नियमानुसार उभारली आहे का याची चौकशी केली पाहिजे. यामध्ये जे अधिकारी दोषी असतील तसेच सुरक्षा नियमांमध्ये हलगर्जी करणारे ठेकेदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी,’ अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. ‘या घटनेमुळे उपस्थित झालेले सुरक्षिततेबाबतचे विषय आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचे प्रश्न यांचा पूर्ण तपास झाला पाहिजे. याची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे,’ अशी मागणी भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली.
