पिंपरी : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिलीच शासकीय जयंती साजरी करताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपमध्ये खडाजंगी झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या महापौरांची बराच वेळ वाट पाहूनही अजितदादांना अभिवादन करण्यासाठी ते आले नाहीत. अखेर दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीच्या उपस्थित पदाधिकार्‍यांनी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. दुपारनंतर महापौरांसह भाजपच्या इतर पदाधिकार्‍यांनी महापालिकेत येऊन अजितदादांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि शासकीय जयंतीचे सोपस्कार पार पाडले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै जन्मदिन. त्यांच्या निधनामुळे त्यांची जयंती शासकीय जयंती म्हणून साजरी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार, महापालिका भवनात बुधवारी सकाळी अजित पवार यांना अभिवादन करण्यात येणार होते. महापौरांच्या उपस्थितीत शासकीय जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे महायुतीतील तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या पहिल्या शासकीय जयंतीसाठी त्यांना अभिवादन करण्याकरिता महापौरांसह भाजपचे इतर पदाधिकारीही हजर राहतील, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना अपेक्षा होती. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सकाळीच महापालिका इमारतीत हजर झाले होते. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही महापौर आलेच नाहीत. महापौर रवी लांडगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पुण्यात गेले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना यायला वेळ लागल्याने महापौर त्यांची वाट पाहत थांबले.

सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनीही येण्यास विलंब लावला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर वैशाली घोडेकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. भाजपसाठी आजचा भावनिक दिवस नसला तरी तो आमच्यासाठी भावनिक दिवस आहे. असे म्हणत घोडेकर यांनी भाजप आमदार अमित गोरखे आणि सभागृह नेते शितोळे यांना खडेबोल सुनावले. महापौरांना आणि भाजप पदाधिकार्‍यांना इतर कामे होती, तर शासकीय जयंतीसाठी सकाळी नऊ वाजता वेळ का ठेवली नाही ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला. दुपारी बारा वाजायला आले तरी महापौर न आल्याने अखेर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह इतर उपस्थित असणार्‍यांनी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. दुपारनंतर महापौर रवी लांडगे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकार्‍यांनी महापालिकेत येऊन अजितदादांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि शासकीय जयंतीचे सोपस्कार पार पाडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे येण्यास विलंब झाला. अजित पवार यांच्याबरोबर माझे अतिशय जवळचे नाते होते. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे महापौर रवी लांडगे म्हणाले.