पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे राेखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. अनधिकृत बांधकामे पाडण्यास नगरसेवकांचे सहकार्य असले पाहिजे. मात्र, बांधकामे पाडण्यास नगरसेवकांचा विराेध हाेतो. ते थेट विराेध न करता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विराेध करतात. यापुढे कारवाईला विराेध केल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याची कायदेशीर कारवाई नगरसेवकांवर केली जाईल,’ असा इशारा महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
शहरात अनधिकृत बांधकामे हाेऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनधिकृत बांधकामांची सर्व्हे क्रमांकासह मुद्रांक विभागाला माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे अनधिकृत बांधकामांची नाेंदणी हाेणार नाही. वीज जाेडणी देऊ नये, यासाठी महावितरणला पत्र दिले आहे. महापालिकाही अशा बांधकाम धारकांना पाणीही देणार नाही. त्यामुळे नागरिक अनधिकृत बांधकामातील घरे खरेदी करणार नाहीत’, असा विश्वास आयुक्त सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
‘संभाजीनगर येथील महापालिकेचे बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय नूतनीकरणाच्या कामामुळे दहा वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. प्राणी संग्रहालयातील तिसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरू केले हाेते. परंतु, एका नगरसेवकाने विराेध करून हे काम थांबविले,’ असा दावा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केला.
नवीन नळजाेड बंद
‘दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. पाणी गळती, चाेरी राेखण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. काम चालू असलेली बांधकामे, तसेच नवीन बांधकामांना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले आहे. टँकरचेही पाणी बांधकामांना वापरता येणार नाही. नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांना नवीन नळजाेड दिला जाणार नाही. बांधकाम व्यावसायिक प्रक्रिया केलेले पाणी वापरतात की नाही, याची पथकामार्फत अचानक भेट देऊन तपासणी केली जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांना पाणी देण्याची जबाबदारी असल्याचे परवानगीवेळी लिहून दिले आहे. त्यांनी ती पार पाडावी,’ असेही विजय सूर्यवंशी म्हणाले.
