scorecardresearch

पाणीकपात धोरण तयार करा; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे.

Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवड महापालिका (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे आगामी पावसाळ्यात सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे पाणीकपात धोरण तयार करावे.पाणीपुरवठ्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक झाली. त्यास सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अजय सूर्यवंशी, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : “संजय राऊत म्हणत होते, ते हेच दंगे….”, किरीट सोमय्यांचं पुण्यातून टीकास्र

पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या अंदाजे ३० लाख इतकी आहे. सद्यःस्थितीत दिवसाआड प्रतिदिन ५७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आगामी काळात पाऊस कमी झाल्यास ऑक्टोबर अखेरपर्यंत पवना धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेतला जाणार आहे. त्याअनुषंगाने जून २०२४ अखेरपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, यावर बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार नियोजन केले जाणार आहे. महापालिकेच्या व खासगी बोअरवेल सर्वेक्षण आणि त्यांची दुरुस्ती करणे, आवश्यकतेनुसार बोअर व विहिरी अधिग्रहण करण्याबाबत माहिती संकलित करणे, पाणीकपात धोरण निश्चित करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणे, पाणी गळती टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. आंद्रा धरणातून निघोज येथे १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपसा करून चिखली येथील नवीन केंद्रामधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सुमारे १०० दशलक्ष लिटर पाणी तूट भरून काढण्यात येणार आहे. यासह भामा आसखेड धरणातून १६५ दशलक्ष लिटर पाणीउपसा करिता प्रकल्प गतिमान करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

पाऊस कमी झाल्यास ऑक्टोबर अखेरपर्यंत पवना धरणातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेतला जाणार आहे. त्याअनुषंगाने जून २०२४ अखेरपर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.- शेखर सिंह

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:44 IST

संबंधित बातम्या