पिंपरी : ‘अनधिकृत जाहिरात फलक, महावितरण, दूरध्वनी खोक्यांवर आणि भिंतींवर चिकटविलेल्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. त्यामुळे जाहिरातींवर नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित जाहिरातदारांना नोटिसा बजावाव्यात. अशा कंपन्यांवर शहर विद्रूपीकरणाबद्दल कायदेशीर कारवाई करावी,’ असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फलक लावले जातात. दूरध्वनी खांब, महावितरण डीपी आणि सार्वजनिक भिंतींवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. हे रोखण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि बीट निरीक्षकांनी नियमित पाहणी करावी. अनधिकृत फलक, बॅनर्स हटवावेत. संबंधित जाहिरातदारांना नोटिसा बजावाव्यात.

फलक हटविण्याबाबत सांगावे. त्यानंतरही फलक न हटविल्यास प्रशासनाने फलक हटवावेत. त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा,’ अशा सूचना आयुक्त सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

‘नागरिक आणि जाहिरातदारांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे. अनधिकृतरीत्या जाहिरात फलक लावणे टाळावे. अन्यथा, संबंधित फलक हटवून त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’ असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.