पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑगस्ट महिन्याच्या तहकूब सभेतील ३१ पैकी १८ विषय बुधवारी (दोन सप्टेंबर) होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आले आहेत. याला हरकत घेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष याेगेश बहल यांनी सभेच्या वैधतेवर आक्षेप घेतला आहे. ॲड. असीम सराेदे यांच्यामार्फत महापाैर रवी लांडगे, आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश काेळप यांना नाेटीस बजावली आहे.
निवडक विषय घेण्यामागचे नेमके कारण काय, तहकूब सभेतील निवडक विषय दुसऱ्या सभेत बेकायदारीत्या घेऊन मंजूर करण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या विरोधात असल्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे. ‘महापालिकेतील बेकायदा काम रोखण्याची जबाबदारी प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त आणि नगरसचिव यांची असताना ते चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामकाजाला प्रोत्साहन देत आहेत. ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार तहकूब करण्यात आलेल्या सभेतील विषय तहकूब सभेतच मंजूर करणे बंधनकारक आहे. परंतु, २० ऑगस्टच्या तहकूब सभेतील ३१ पैकी १८ विषय सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर आणले आहेत,’ असे बहल यांनी सांगितले.
‘एकच विषय दोन वेगवेगळ्या सभांच्या कायदेशीर कक्षेत राहू शकत नाही. सप्टेंबर महिन्याच्या सभेच्या विषयपत्रिकेवरून तहकूब सभेतील विषय वगळावेत. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अधिकृत तहकूब सभेतच नियमानुसार चर्चेला ठेवण्यात यावेत, अन्यथा याविरोधात न्यायालयात धाव घेण्यात येईल,’ असा इशारा बहल यांनी दिला आहे.
निवडक विषय घेण्यामागचे नेमके कारण काय?
‘निवडक विषय घेण्यामागचे नेमके कारण काय, तहकूब सभेतील निवडक विषय दुसऱ्या सभेत बेकायदेशीरपणे घेऊन मंजूर करण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या विरोधात असल्याचे नोटीसीमध्ये म्हटले आहे. एकच विषय दोन वेगवेगळ्या सभांच्या कायदेशीर कक्षेत राहू शकत नाही, अशी भूमिका बहल यांनी घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सभेच्या विषय पत्रिकेवरून तहकूब सभेतील विषय वगळावेत, अशी मागणी योगेश बहल यांनी केली आहे.
