पिंपरी : सात महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आता नोटिसांचा धडाका सुरु केला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठता आणि महापालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांना नोटिसा दिल्या असून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
‘वायसीएम’च्या अधिष्ठात्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
सहायक प्राध्यापकाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या प्रकरणातील आरोपांचे स्वरूप, त्याची गंभीरता, तसेच पोलीस चौकशी आणि तपास सुरू असल्याची बाब विचारात घेऊन डाॅ. वाबळे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांस अशोभनीय ठरेल असे गैरवर्तन करून, कर्तव्याप्रती नितांत सचोटी ठेवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुदतीत खुलासा सादर न केल्यास अथवा केलेला खुलासा असमाधानकारक आढळल्यास नियमाधीन कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त सूर्यवंशी यांनी नोटिशीतून दिला आहे.
पुरातन दर्जा असलेली झाडे तोडण्यास नियमबाह्य परवानगी?
पिंपरीतील एका खासगी जागेमधील पुरातन दर्जा असणाऱ्या ५२ झाडांचे वय आणि संख्या कमी दाखवून त्यामध्ये फेरफार करून वृक्षताेडीस प्राेत्साहन दिल्याचा ठपका ठेवत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगाेटे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
पिंपरीतील एका खासगी जागेत पुरातन दर्जा असणारी ५२ झाडे होती. या झाडांची प्रचलित नियम, शासनाचे निर्देश तसेच आवश्यक प्रशासकीय परवानगी न घेता वृक्षतोड करण्यास परवानगी दिल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. झाडांची संख्या व झाडांचे वय कमी दाखवून त्यामध्ये फेरफार करून वृक्षतोडीस प्रोत्साहन दिले. महापालिकेचे आर्थिक नुकसान करुन महसुली उत्पन्न कमी केल्याचे गंभीर गैरकृत्य केल्याचे तक्रारीत नमुद आहे.
त्यामुळे तुमच्याविराेधात शिस्तभंगविषयक कारवाई का प्रस्तावित करण्यात येवू नये? याबाबतचा लेखी खुलासा नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत समक्ष सादर करावा. मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा केलेला खुलासा असमाधानकारक असल्यास याेग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त सूर्यवंशी यांनी दिला आहे. दरम्यान, मुख्य उद्यान अधीक्षक गारगाेटे यांच्यावर शहरातील पालिकेच्या उद्यानाची निर्मीती, सुशोभिकरण, दुरुस्ती व नियमित देखभाल करणे, नवीन वृक्षांची लागवड, त्यांचे संगोपन, अणि वृक्षांचे संरक्षण करणे आदी विषयक कामकाज सोपविण्यात आले आहे. सोपविलेल्या कामकाजावर प्रभावी पर्यवेक्षण आणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी गारगाेटे यांच्यावर आहे.
