पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि आकारणी विभागामार्फत मालमत्ताधारकांना महिला बचत गटांमार्फत घरोघरी जाऊन देयकांचे वितरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ३१२ कोटी ४६ लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख ३३ हजार ६६४ निवासी, औद्याेगिक, मिश्र, माेकळ्या जमीन, औद्योगिक अशा मालमत्ता आहेत. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नांचा मुख्य स्त्रोत आहे. यंदा विभागाला एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने महिला बचत गटांच्या माध्यमातून देयकांचे वितरण करण्यात आले आहे. मालमत्ता कराचे देयक ऑनलाइन पद्धतीनेही महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना वितरित देयकासोबतच जप्तीपूर्व नोटीस देखील दिली जात आहे. आतापर्यंत ३२ हजार ५०० थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी तत्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा कर भरावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मालमत्ता कर देयकांचे वितरण पूर्ण झाले आहे. मालमत्ताधारकांनी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने कराचा भरणा करावा. अन्यथा मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येईल. अद्यापही देयक मिळाले नसेल परिसरातील कर संकलन विभागीय कार्यालयाशी संपर्क करून देयक प्राप्त करून घ्यावे’असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी केले.