पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी बाेगस उपसूचनांद्वारे तरतुदींमध्ये वाढ-घट करून ५२ काेटी रूपयांची देयके ठेकेदारांना अदा केल्याचा गंभीर आरोप स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी केला आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याच्या कारभाराची चाैकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना अध्यक्षांनी आयुक्तांना केली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याने सर्व आरोप फेटाळले आहेत.

स्थायी समितीची सभा बुधवारी पार पडली. या सभेत विविध विकास कामांच्या विषयांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर बारणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आर्थिक वर्षाच्या (२०२५-२६) ३० आणि ३१ मार्च या दाेन दिवसांमध्ये हा प्रकार झाल्याचे सांगून स्थायी समिती अध्यक्ष बारणे म्हणाले, ‘मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी अतिशय चुकीचे काम केले आहे. बाेगस उपसूचनांद्वारे तरतुदींमध्ये वाढ-घट केली. त्यामध्ये पाणी पुरवठा, स्थापत्य, बीआरटीएस विषयक कामांचा समावेश आहे. वेगवेगळ्या ७० कामांची एक ते दीड काेटी रूपयांची देयके अदा केली आहेत. जैन यांनी ठेकेदारांना दाेन नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आणण्याची अट घातली. त्यानुसार देयक काढून घेण्यासाठी या उपसूचनांवर ठेकेदारांनी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आणल्याचा आरोप बारणे यांनी केला.

दिशाभूल करून स्वाक्षऱ्या

प्रभागातील कामे असल्याचे सांगून नगरसेवकांची दिशाभूल करून स्वाक्षऱ्या घेतल्या. सर्व पक्षीय २० नगरसेवकांच्या उपसूचनांवर स्वाक्षऱ्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा काेणत्याही तरतूद वाढ-घट करण्यासाठीच्या उपसूचनांना स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने मान्यता दिली नाही. याबाबत संबंधित विभागप्रमुखांनाही काेणतीही माहिती नाही. नगरसचिव कार्यालयाकडे तरतूद वर्गीकरणाच्या उपसूचनांची नाेंद नाही. त्यामुळे या बाेगस उपसूचनांच्या आधारे ठेकेदारांना ५२ काेटी रूपयांची देयके अदा केल्याचा आराेप बारणे यांनी केला.

कामांची माहिती घेणार

ठेकेदारांना काम केल्याची देयके अदा करण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, काेणतीही मान्यता नसताना बाेगस उपसूचनांच्या आधारे देयके अदा करणे हा गंभीर प्रकार आहे. देयके अदा करताना केवळ कामाचे नाव असून ठेकेदारांची नावे नाहीत. पैसे दिलेली कामे पूर्ण झाली आहेत की नाही, याची माहिती घेण्यात येत असल्याचे बारणे यांनी सांगितले.

दाेन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सहभाग?

उपसूचनांद्वारे ५२ कोटींची देयके अदा करण्याच्या प्रकरणामध्ये प्रमुख दाेन पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची कुजबूज महापालिका वर्तुळात रंगली आहे. या दाेन पदाधिकाऱ्यांनी स्थायी समितीला वगळून मुख्य व लेखा वित्त अधिकाऱ्यांना हाताशी धरून देयके अदा केल्याची चर्चा आहे.

हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याची सखाेल चाैकशी करून फाैजदारी गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल हाेत नाही ताेपर्यंत शांत बसणार नाही. उपसूचनांच्या नावाखाली लूट हाेऊ देणार नाही, असा इशारा स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिला. देयके अदा करताना कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नाही. सर्व प्रकारचे कागदपत्रे उपलब्ध आहेत, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सांगितले.