१२२ जणांची उमेदवार संख्या असलेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवला. १२२ पैकी ७८ ठिकाणी विजयी होऊन भाजपने प्रथमच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेवर आपला ताबा मिळवला आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. बिनविरोध निवडून आलेल्या रवी लांडगे यांची विजेता म्हणून घोषणा करण्यात आली. एका तासानंतर हळुहळु चित्र उलगडू लागले. दुपारपर्यंत भारतीय जनता पक्ष ५० पेक्षा जास्त जागी आघाडीवर होता. ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे काही प्रभाग पूर्णपणे निवडून येऊ लागले ते पाहता भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये बहुमत मिळवेल असे वाटू लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये ७८ जागा मिळाल्या आहेत. मागील वेळी ८४ जागा मिळवलेल्या   राष्ट्रवादीला यावेळी मात्र ३५ जागा मिळावत्या आल्या. शिवसेनेला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत, तर मनसेला एक जागा मिळाली आहे. राष्ट्रवादीला अनेक मोठे धक्के बसले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा धक्का म्हणजे शकुंतला धराडे यांचा पराभव झाला आहे. १२२ जणांच्या महानगर पालिकेमध्ये बहुमतासाठी ६१ जागा मिळणे आवश्यक होते. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला धूळ चारुन मोठा विजय संपादन केला आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिका म्हणजे अजित पवार यांचा बालेकिल्ला. त्यांना आपला गड राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली महानगर पालिका अजित पवार यांना गमवावी लागली. अनेक कामे करुन पायाभूत सुविधांचा विकास करुन देखील आपण येथे निवडणूक का हरलात असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला.

निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या नेत्यांचे ‘आउटगोइंग’ झाल्यामुळे आम्हाला फटका बसला असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तरी देखील आमचा पराभव का झाला याचे आम्ही पूर्ण विश्लेषण करू असे त्या म्हणाल्या. या पराभवाची कारणे आम्ही शोधणार आहोत असे त्या म्हणाल्या.

सहा वेळा निगडी प्राधिकरणमधून जिंकलेले आणि सातव्या वेळी निवडणुकीस उभे राहिलेले राष्ट्रवादीचे आर. एस. कुमार हे पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शीतल काटे हे पती पत्नी जिंकले आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या शत्रुघ्न काटे यांनी सात हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळवले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation election results 2017 live updates ncp bjp shivsena ajit pawar
First published on: 23-02-2017 at 08:39 IST